श्रीगोंदेकरांचं ठरलं..! पाचपुते, नागवडे, शेलारांवर पुन्हा मात? ‘त्या’ युवा नेत्यावर नजरा ‘तो’ ठरणार श्रीगोंद्यातला सायलेंट विनर

Published on -

Ahmednagar Politics News : आमदार असतानाही शाही थाटात लग्न न करता सामुदायिक विवाह सोहळ्यात शुभमंगल केल्यानंतर राहुल जगताप राज्यात चर्चेत आले होते. सात वर्षांपूर्वी त्यांनी आपल्यासोबत नऊ जोडप्यांचा विवाह लावत त्यांच्या लग्नाचा खर्च उचलला होता. शिवाय कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या व पेशाने डाँक्टर असणाऱ्या डाँ. प्रणोती राजेंद्र चव्हाण यांच्यासोबत विवाह करुन त्यांनी एक नवा आदर्श घालून दिला होता. प्रतिभा पाचपुते, अनुराधा नागवडे यांच्यानंतर तालुक्याच्या तिसऱ्या वहिनीसाहेब झालेल्या डाँ. प्रणोती यांनीही पतीच्या खांद्याला खांदा लावत समाजकार्यात स्वतःला झोकून दिले.

मात्र तरीही गेल्यावेळी 2019 ला राहुल जगताप यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर करत, कार्यकर्त्यांना धक्का दिला होता. नाट्यमय घडामोडीनंतर त्यांनी सर्वसंमतीने घनश्याम शेलार यांना तिकीट देण्याची शिफारस राष्ट्रवादीकडे पाठवली होती. मात्र आता गेल्या पाच वर्षांत श्रीगोंद्याच्या राजकारणात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. गेल्यावेळी थांबलेले राहुल जगताप यावेळी पुन्हा रिंगणात उतरतील का, हा खरा प्रश्न आहे. राहुल जगतापांचे व एकंदर श्रीगोंद्याच्या राजकारणात नेमके काय चालले, याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट.

२०१४ ला वयाच्या २५ व्या वर्षी राहुल जगताप हे श्रीगोंद्याचे सर्वात तरुण आमदार झाले. मोदी लाटेतही जगतापांनी ९९ हजार २८१ मतं मिळवत मंत्री असलेल्या पाचपुतेंचा १३ हजारांनी पराभव केला होता. गेल्यावेळी म्हणजेच २०१९ ला मात्र, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना भाजपची उमेदवारी जाहिर झाल्यानंतर श्रीगोंद्याची सगळीच समि‍करणे बदलली. नगर तालुक्यात असणाऱ्या व श्रीगोंदा विधानसभेला जोडलेल्या गावांत भाजप आणि शिवसेनेचा प्रभाव होता. त्यावेळी जगताप व काँग्रेसच्या अनुराधा नागवडे याही भाजपच्या उमेदवारीच्या शोधात होत्या.

मात्र झालं वेगळंच. विद्यमान आमदारांवर भाजपने विश्वास टाकला आणि पाचपुतेंना पुन्हा उमेदवारी मिळाली. मग त्यावेळी पाचपुतेंचा पराभव करण्यासाठी एकास एक उमेदवार देण्यावर विरोधकांचे एकमत झाले. त्यावेळी नागवडे व जगतापांनी माघार घेतली. जगताप, बाबासाहेब भोस, आण्णा शेलार, मनोहर पोटे, हरिदार शिर्के, अतुल लोखंडे यांनी घनश्याम शेलारांना पुढं केलं. मात्र तरीही पाचपुतेंनी आपल्या राजकीय अनुभवाचा पुरेपुर वापर करत, शेलारांचा पराभव करत निसटता विजय मिळवला.

त्यानंतर मात्र गेल्या पाच वर्षात राहुल जगताप यांनी सावध पवित्रा घेत, स्वतःच्या कार्यकर्त्यांना बळ दिलं. तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीत आश्वासक पाऊले टाकली. तालुक्यातील प्रत्येक गटातील कार्यकर्ते, मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क करुन भूमिका स्पष्ट केली. समर्थक मतदारांशी संपर्क ठेवत विरोधकांना थेट उत्तर न देत आपलं काम सुरु ठेवलं. तालुक्यातील स्वतःची यंत्रणा विस्तारली. तालुक्यातील राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन गेल्या तीन वर्षांपासून एकला चलो रे ची भूमिका घेऊन स्वतःचं वेगळेपण कायम ठेवलं. गावोगावच्या ग्रामपंचायती, सेवा संस्थांमध्ये स्वतंत्र यंत्रणा उभी करत ताकद वाढवली. याचा परिणाम खरेदी विक्री संघ व बाजार समितीच्या निवडणुकीत दिसला. या दोन्ही निवडणुकांत जगताप गटाने बाजी मारली.

श्रीगोंदा तालुक्यात नागवडे- पाचपुतेंशिवाय तिसरी राजकीय शक्ती उदयाला येऊ शकत नाही, हे विश्लेषकांचे आखाडे जगतापांनी मोडून काढले. आताही दरवेळी असतात तसे तालुक्यात विधानसभेला सर्वच इच्छुक आहेत. पाचपुते भाजपकडून, नागवडे अजितदादा गटाकडून, घनश्याम शेलार काँग्रेसकडून, साजन पाचपुते ठाकरे गटाकडून, आण्णा शेलार मिळेल त्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल म्हणत विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. मात्र गेल्या पाच वर्षात थंड आणि शांत डोक्याने सुरु असलेले राहुल जगतापांचे राजकारण यावेळी सुरु आहे. शरद पवार गटाकडून यावेळी तेच उमेदवार असणार, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांना व त्यांनाही खात्री आहे. गेल्या पाच वर्षात तालुक्यातील सर्व निवडणुकांत दिसलेला फार्म यावेळी विधानसभेलाही जगताप कायम ठेवतील, अशा शक्यता वाढल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe