महाराष्ट्राला मिळाली आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस ! ‘हा’ जिल्हा ठरला भाग्यशाली

Ahmednagarlive24
Published:

Maharashtra Vande Bharat : मध्य व दक्षिण भारताला जोडणारी अतिजलद रेल्वेसेवा प्रवाशांच्या सेवेत येत्या १५ सप्टेंबरपासून रूजू होत आहे. १३० प्रति किलोमीटर तासाने धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस १६ डब्याची राहणार आहे. नागपूर ते सिकंदराबाददरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला पाच शहरांत थांबे देण्यात आले असून, चंद्रपूर जिल्हा भाग्यशाली ठरला आहे.

चंद्रपूर व बल्लारपूर येथील रेल्वेस्थानकावरून प्रवाशांना सुविधा मिळणार आहे. नागपूर ते सिकंदराबाद वंदे भारत एक्स्प्रेस बल्लारपूरमार्गे येत्या १५ सप्टेंबरपासून धावणार असल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्रव्यवहार करून मध्य व दक्षिण भारताला जोडणारी वंदे भारत रेल्वेसेवा देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल रेल्वे मंत्रालयाने घेतली. दक्षिण मध्य रेल्वे विभागाने वंदेभारत एक्स्प्रेसला मान्यता दिली.

रेल्वे प्रशासन येत्या १५ सप्टेंबरपासून नागपूर ते सिकंदराबाददरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला सुरू करणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. नागपूर ते सिकंदराबाददरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी जानेवारी २०२३ ला घेण्यात आली होती.

त्यानंतर दररोज धावण्यास मुहूर्त ठरविण्यात आले आहे. ही अतिजलद अत्याधुनिक व आरामदायक वंदे भारत नागपूर येथून सुटल्यानंतर सेवाग्राम, चंद्रपूर, बल्लारपूर, रामगुडंम, काजीपेठ येथील प्रवाशांना घेऊन सिकंदराबाद येथे पोहोचणार आहे.

या रेल्वे मार्गातील अंतर ५७८ किलोमीटर इतके आहे. या रेल्वेमुळे पर्यटक, व्यापारी, विद्यार्थी व उद्योजकांना मोठा दिलासा मिळणार आहे, असा विश्वास नमो रेल्वे वेलफेयर पॅसेंजर असोसिएशनचे अध्यक्ष अजय दुबे यांनी व्यक्त केला आहे.

नागपूर ते सिकंदराबाद वंदे भारत रेल्वेचे वेळापत्रक
नागपूर ते सिकंदराबाद ही वंदे भारत एक्स्प्रेस दररोज धावणार आहे. ही अतिजलद रेल्वेगाडी नागपूर येथून पहाटे ५ वाजता सुटणार आहे. दरम्यानच्या पाच रेल्वे थांब्यावर प्रत्येकी दोन मिनिट थांबून पुढे मार्गस्थ होणार आहे. सेवाग्राम येथून ५.५० वाजता, चंद्रपूर येथून ७.२० वाजता,

बल्लारपूर येथून ७.४० वाजता, रामगुडंम येथून ९.१० वाजता, काजीपेठ येथून १०.०६ वाजता सुटणार असून सिकंदराबाद येथे १२.१५ पोहोचणार आहे. सिकंदराबाद येथून परतीचा प्रवास रात्री १ वाजता सुरू होणार असून ही रेल्वे नागपूर रेल्वेस्थानकावर सकाळी ८.२० वाजता पोहोचणार असल्याचे रेल्वे विभागाने कळविले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe