गेल्या काही वर्षापासून सातत्याने विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टिकोनातून भुईसपाट केल्याचे चित्र आपल्याला दिसून येते. गारपीट तसेच वादळी वारे, उत्पादन हातात येईल तेव्हाच अवकाळी पावसाचे झालेले आगमन आणि त्यातल्या त्यात फळबागा किंवा भाजीपाला पिकांवर येणाऱ्या रोगराई त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका सहन करावा लागतो.
कितीही प्रमाणामध्ये नुकसान झाले तरी ते सहन करून पुन्हा उठून उभे राहून पुन्हा परिस्थितीशी झगडत शेतीशी समरस होणे हे फक्त शेतकऱ्यालाच जमू शकते. अगदी याच प्रमाणे जर आपण नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात असलेल्या विंचुरे या गावचे प्रकाश शिंदे यांची यशोगाथा बघितल तर ती अशीच खडतर आणि त्यांच्या अखंड मेहनतीची फळ देणारी आहे.
डाळिंब आणि द्राक्ष बागेत आले होते मोठे अपयश
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नाशिक जिल्ह्यातील बागलाण तसेच देवळा व कळवण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर डाळिंबाची लागवड अगोदर केलेली होती व याच प्रकारे बागलाण तालुक्यात असलेल्या विंचुरे गावचे प्रकाश बाळू शिंदे यांची देखील 16 एकर जमीन आहे. परंतु ही जमीन माळरानावर असल्याने त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ऑनलाइन ठिबकच्या साह्याने पाणी व्यवस्थापन करत शेती यशस्वी गेलेली आहे.
माळरानाची जमीन म्हटले म्हणजे तिचा मगदूर हा मुरबाड सदृश्य जमिनी सारखा आहे. या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या उंच सखल जमिन त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर कष्ट करून आणि खर्च करून समतल केली होती व त्या ठिकाणी पाणी नसल्याने पाण्याची व्यवस्था करण्यासाठी तीन किमी लांबून पाईपलाईन टाकून पाण्याची सोय केली व त्यानंतर आठ एकर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड केलेली होती.
त्यानंतर तीन वेळा त्यांनी डाळिंबाचे उत्पादन घेतले व मात्र संपूर्ण डाळिंबाची बाग तेल्या रोगाला बळी पडली. तीन वर्ष बागेपासून उत्पादन घेतल्यानंतर देखील त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. शेवटी त्यांनी ती डाळिंबाची बाग काढून टाकली व न हारता त्यांनी कर्ज घेतले व कांदा आणि भाजीपाला सारख्या पिकातून जे काही उत्पन्न मिळाले या उत्पन्नातून द्राक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला व द्राक्ष बाग लागवड केली.
परंतु तीन ते चार वर्ष झालेल्या अति पावसामुळे पिकवलेले द्राक्ष बाजारपेठेपर्यंत पोहोचलेच नाही व मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. या दोन्ही पिकांमुळे झालेल्या नुकसानीमुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक दृष्टिकोनातून त्यांना फटका बसला.
पुन्हा घेतला डाळिंब लागवडीचा निर्णय
त्याच वडिलोपार्जित असलेल्या 16 एकर जमिनीमधून त्यांनी परत आठ एकर क्षेत्रावर डाळिंब लागवड करण्याचा निर्णय घेतला. यावेळी मात्र त्यांनी मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला व कमी पाणी देणारी इनलाइन ठिबक संच वापरून पाण्याचे योग्य व्यवस्थापन केले.
तसेच द्राक्ष शेती ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी पुन्हा डाळिंब लागवड केल्यामुळे द्राक्ष बागेसाठी असलेल्या तार व अँगल या सगळ्या स्ट्रक्चरचा वापर त्यांनी डाळिंबाच्या फांद्यांना आधार देण्यासाठी केला. परंतु यावेळेस निसर्गाने आणि नियतीने त्यांना साथ दिली व सध्या डाळिंबाचे दर्जेदार उत्पादन घेण्यात त्यांनी यश मिळवले.
जेव्हा झाडांवर शंभर ग्रॅमचे फळ तयार झाले तेव्हा त्यांनी बागेवर नेटलॉन अच्छादन देखील केले. खत आणि कीटकनाशक फवारणीचे योग्य नियोजन करून निर्यातक्षम दर्जेदार डाळिंबाचे उत्पादन घेण्यात यशस्वी झाले. अवघ्या 24 महिन्यांच्या झाडावर आज त्यांना एकरी दहा टन उत्पादन मिळाले व आठ एकरात आठ टनाचे उत्पादन घेण्यात ते यशस्वी ठरले आहेत.
या डाळिंब उत्पादनातून त्यांना लाखोत आर्थिक उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. अशा पद्धतीने प्रकाश शिंदे यांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते की, कुठल्याही व्यवसायामध्ये अपयश आले तरी न हरता कष्टाने आणि उमेदीने उभे राहून अगोदर पेक्षा उत्तम प्रकारे प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळते हे दिसून येते.