राज्यामध्ये विधानसभा निवडणूक 2024 चे वारे आता जोरात व्हायला लागले असून प्रत्येक पक्षामध्ये आता या विधानसभा निवडणुकीसाठीची आवश्यक मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आलेली आहे. राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या माध्यमातून आता विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजी बनवायला सुरुवात करण्यात आली असून लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश टिकवण्याचे आवाहन महाविकास आघाडी पुढे आहे तर महायुती पुढे असलेली सत्ता टिकवून महाविकास आघाडीला नमवण्याचे आवाहन आहे.
या सगळ्या विधानसभेच्या धामधुमीत मात्र अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण हे प्रत्येक बाबीने आपल्याला वेगळे आणि वरचढ ठरताना दिसून येत आहे. यामध्ये जर आपण कोपरगाव शहराच्या दृष्टिकोनातून पाहिले तर त्या ठिकाणी दिनांक 15 रोजी आ. आशुतोष काळे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण करताना पाच नंबर साठवण तलावाचे काम पूर्ण करून शब्द पूर्ण केला व जणू काही या निमित्ताने विरोधकांवर निशाणा साधतांना त्यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंगच फुंकले.

आमदार आशुतोष काळे यांनी केले 5 नंबर साठवण तलावाचे जलपूजन
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव शहराचे नागरिक गेल्या कित्येक दशकांपासून असलेला पाणी प्रश्न सुटावा याकरिता प्रतीक्षेत होते. कोपरगाव शहरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा शब्द 2019 च्या विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान आशुतोष काळे यांनी दिलेला होता व तो शब्द त्यांनी आज पूर्ण करून दाखवला आहे.
नुकतेच पाच नंबर साठवून तलावाच्या पाण्याचे विधीवत जलपूजन आ. आशुतोष काळे व त्यांच्या पत्नी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली ताई काळे यांच्या हस्ते व त्यांच्यासोबत सर्व जाती-धर्माचे साधू महंत व धर्मगुरू तसेच या संख्येने कोपरगावकर नागरिक उपस्थित होते.
यावेळी के.जे.एस. कॉलेज पासून ते येसगाव येथील पाच नंबर साठवून तलावापर्यंत मोटरसायकल रॅली देखील काढण्यात आलेली होती.या कार्यक्रमाच्या अगोदर आ. आशुतोष काळे यांनी शहरातील महापुरुषांच्या स्मारकांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन देखील केले.
काय म्हणाले आ.आशुतोष काळे?
या कार्यक्रमापासून बोलताना आ. आशुतोष काळे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की पाच नंबर साठवण तलावाचे काम जेव्हा सुरू करण्यात आले तेव्हापासून अनेकांना त्यांची राजकीय दुकानदारी बंद होईल अशा प्रकारची भीती होती. त्यामुळे सातत्याने या साठवण तलावाच्या कामांमध्ये अडथळे आणण्यामध्ये त्यांनी धन्यता मानली.
परंतु या सगळ्या अडचणींवर मात करत मी दिलेला शब्द पूर्ण केला. पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, या साठवण तलावासाठी आवश्यक असलेले जे काही साहित्य आणण्यात आलेले होते ते समृद्धी महामार्गासाठी घेऊन जाण्याचे ठरले असताना त्यात झालेले राजकारण देखील कोपरगावचे नागरिक जाणून आहेत. जेव्हा मी निवडून आलो तेव्हा दोनच महिन्यांमध्ये हे काम सुरू करून कोपरगाव नगर परिषदेचे आठ कोटी रुपये वाचवण्यामध्ये मी यशस्वी झालो.
यासाठीची आवश्यक असलेली तांत्रिक मान्यता घेतल्यानंतर प्रशासकीय मंजुरी मिळवून या साठवण तलावा करीता 131.24 कोटीचा निधी आणला. या निधीचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर कोपरगाव नगर परिषदेकडे 15 टक्के लोक वर्गणी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे विरोधकांनी त्यावेळी या साठवण तलावाचे काम पूर्ण होणार नसल्याचे अफवा देखील पसरवल्या.
परंतु याही परिस्थितीत मार्ग काढताना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजित पवार यांच्या सहकार्याने 15 टक्के रक्कम माफ करून आणले व कोपरगावकरांचे जवळपास 20 कोटी रुपये वाचवण्याचे काम केले. तसेच साठवण तलावासाठी पाणी आरक्षित करणे गरजेचे होते व त्याकरिता कोपरगाव नगर परिषदेकडे थकीत असलेली पाणीपट्टी भरणे आवश्यक होते व ती भरण्याकरिता हप्ते पाडून घेत पाणी आरक्षित केल्यानंतर शेतीचे पाणी कमी होईल अशी अफवा पसरवून न्यायालयात वेगवेगळ्या नावाने आठ याचिका दाखल करण्यात आल्या
व या याचिकांच्या निमित्ताने आतापर्यंत 22 तारखा देखील झाल्या असून अजूनही याबाबत कोर्टात सुनावणी सुरू असून अशाप्रकारे विरोधकांनी कोपरगावच्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासन वंचित ठेवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु कोपरगावकरांच्या आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे त्यांचे हे सगळे मनसुबे यशस्वी होऊ शकले नाहीत असे देखील त्यांनी म्हटले.
विरोधकांनी केली ही चुकीचे कामे– आ.आशुतोष काळे यांचा आरोप
यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांच्या कार्यकाळातील केलेल्या कामांवर देखील टीका केली. त्यांनी म्हटले की, विरोधकांच्या कार्यकाळातील जर आपण काम पाहिले तर संगमनेर बस स्थानकाच्या धर्तीवर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधून या ठिकाणी बाजारपेठेला चालना मिळाली असती. परंतु बस स्थानक चुकीचे बांधले गेले. जलतरण तलाव कुठे आहे? हा देखील प्रश्न त्यांनी बोलताना उपस्थित केला.
त्यासोबतच क्रीडा संकुलाचा शहराला उपयोग नाही असे अनेक चुकीचे कामे केल्याचे देखील त्यांनी म्हटले. परंतु आता कोपरगाव शहरामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले असून अनेक उत्तुंग अशा शासकीय इमारती कोपरगावच्या वैभवामध्ये आता भर घालत आहेत. यामध्ये नगर परिषदेसमोरील दोन व्यापारी संकुल तसेच बाजार तळ व्यापारी संकुल,
आयटीआय कॉलेज, बसस्थानक व्यापारी संकुल अशा अनेक शासकीय इमारती आता कोपरगाव शहरात दिमाखाने उभे आहेत. तसेच सर्व समाजाचे सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुशोभीकरण, जिजामाता उद्यान व इतर उद्याने, नदी संवर्धन तसेच कोपरगाव अमरधाम, कब्रस्तान विकास तसेच सर्व प्रमुख रस्त्यांचा विकास झाला असून यासाठी साडेतीनशे कोटी जवळपास निधी खर्च झाला असून भूमिगत गटार योजनेची प्रशासकीय मान्यता आता अंतिम टप्प्यामध्ये असून त्याच्यासाठी 323 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे व असे जवळपास 700 कोटी निधी शहराच्या विकासासाठी आणल्याचे देखील त्यांनी म्हटले.
विधानसभा निवडणुकीत विकासाच्या आडवे येणाऱ्यांना गाडून टाकण्याचे आवाहन
यावेळी बोलताना त्यांनी केलेल्या कामांची माहिती देत असतानाच आता पुढे काय करायचे आहे याबद्दल देखील माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की कोपरगाव शहर आपल्याला स्मार्ट सिटी करायचे असून राज्यात नंबर एक करायचे आहे. एमआयडीसीचा फायदा कोपरगावला मिळणार असल्यामुळे कोपरगावच्या बाजारपेठेला याचा खूप मोठा फायदा होईल असे देखील त्यांनी म्हटले.
यावेळी बोलताना त्यांनी कोपरगाव शहराच्या विकासात जर कोणी आडवे येत असेल तर त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आडवे गाडून टाकण्याचे आवाहन देखील नागरिकांना केले. यावरून आपल्याला दिसून येते की आ. आशुतोष काळे यांनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले की काय?