Health Tips:- मूत्रपिंड म्हणजेच किडनी हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा भाग असून शरीरामधील जे काही टाकाऊ पदार्थ असतात ते फिल्टर करण्याचे महत्त्वपूर्ण काम किडनीच्या माध्यमातून पार पाडले जाते. परंतु जर किडनीच्या मध्ये काही समस्या निर्माण झाल्या तर मात्र या प्रकारचे टाकाऊ पदार्थ फिल्टर करण्यामध्ये समस्या निर्माण होऊन कीडनीला होणारा रक्तपुरवठा थांबतो व किडनी अशावेळी फेल म्हणजे निकामी होऊ शकते.
किडनी जर फेल झाली तर शरीरामध्ये नको असलेले धोकादायक टाकाऊ पदार्थ मोठ्या प्रमाणावर जमा व्हायला लागतात व त्याचे अनेक प्रकारचे विपरीत बदल शरीरात दिसून येतात. याबद्दल लघवीच्या समस्यांचा देखील समावेश होतो.
त्यामुळे या लेखामध्ये जर किडनी निकामी झाली तर लघवीच्या माध्यमातून कोणते बदल जाणवतात किंवा कोणती लक्षणे दिसून येतात? याबद्दलची माहिती बघू.
लघवी झालेले हे बदल दर्शवतात तुमच्या किडनीचे आरोग्य
1- लघवी करताना जळजळ होणे– जर तुम्ही लघवी करायला गेलात आणि लघवी करताना जर तीव्र स्वरूपाच्या वेदना किंवा कळ आल्यासारखे वाटत असेल तर हे किडनीमध्ये संसर्ग झाल्याचे लक्षणं असू शकते. अशा प्रकारची समस्या तुम्हाला दररोज येत असेल तर लवकर डॉक्टरांकडून योग्य ते उपचार करून घेणे गरजेचे आहे.
2- लघवीच्या रंगात बदल होणे– लघवीच्या रंगांमध्ये जर तुम्हाला नेहमीपेक्षा काही बदल दिसून येत असेल तर वेळीच सावध रहाणे आवश्यक आहे. त्यामध्ये जर लघवीचा रंग लाल किंवा फिकट गुलाबी दिसला तर किडनी इन्फेक्शन, किडनी फेल्युअर आणि ब्लेडर इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते.
3- लघवीला फेस येणे– लघवी करताना जर लघवीमध्ये फेस येत असेल तर ते प्रोटीनुरियाचे लक्षण असल्याची शक्यता असते. लघवीमध्ये दिसणाऱ्या या लक्षणांमुळे तुमची किडनी निकामी होत असल्याचे तुम्ही समजून घ्यायला हवे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सावध राहावे.
4- लघवीतून रक्त येणे– लघवीतून रक्त येणे हे मूत्रपिंडाच्या संसर्गाचे एक गंभीर लक्षण समजले जाते. लघवीचा रंग गुलाबी, लाल किंवा तपकिरी दिसत असेल तर हा एक गंभीर संकेत असू शकतो. अशा परिस्थितीमध्ये ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
5- लघवीला वास येणे– लघवीला जर सामान्य पेक्षा जास्त तीव्र स्वरूपाचा किंवा असामान्य स्वरूपाचा वास येत असेल तर हे मूत्रपिंडामध्ये झालेली संसर्गाचे लक्षण असल्याची शक्यता असते. त्यामुळे अशा लक्षणाकडे दुर्लक्ष करणे चुकीचे ठरते. अशा परिस्थितीत त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
6- कमी प्रमाणात लघवी होणे– किडनी निकामी झाल्यास तुम्हाला लघवी करण्याची तीव्र इच्छा जाणवते. परंतु लघवी करताना ती बाहेर येत नाही व अशा परिस्थितीत खूप अस्वस्थ वाटते. कधीकधी लघवी अगदी सामान्य प्रमाणामध्ये बाहेर येते.
7- सारखे सारखे लघवीला होणे– जर तुम्हाला सारखे सारखे लघवीला जावे लागत असेल व कमी प्रमाणामध्ये लघवी बाहेर पडत असेल तर हे किडनीच्या संसर्गाचे लक्षण असू शकते. किडनीचा अथवा मूत्रमार्गाचा संसर्ग झाल्यानंतर हे लक्षण अगोदर दिसतात. त्यामुळे पटकन डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे गरजेचे आहे.