Canara Bank Loan:- देशातील जे काही छोटे व्यवसायिक आहेत त्यांना अनेकदा व्यवसाय वाढीसाठी पैशांची कमतरता भासायला लागल्यानंतर त्यांचे व्यवसाय हे अडचणीत येतात व कधीकधी असे व्यवसाय हे बंद करावे लागतात. त्यामुळे अशा छोट्या व्यवसायांसाठी खेळते भांडवल स्वरूपात किंवा इतर कामांसाठी वेळेवर पैसा उभा राहणे खूप गरजेचे असते.
जेणेकरून छोट्या व्यावसायिकांना व्यवसाय वाढवणे सोपे जाते. त्यामुळेच कॅनरा बँकेने आता छोट्या व्यावसायिकांसाठी एक नवीन कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत कॅनरा बँक आता छोटे व्यवसायिकांना त्यांनी भरलेल्या जीएसटी रिटर्नवर आधारित कर्ज देणार आहे व ही रक्कम व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी वापरता येणार आहे.

काय आहे कॅनरा बँकेची डिजिटल लोन कॅनरा ई जीएसटी योजना?
कॅनरा बँकेच्या माध्यमातून छोट्या व्यवसायांसाठी नवीन कर्ज योजना सुरू करण्यात आलेली आहे व या योजनेअंतर्गत या व्यावसायिकांना जीएसटी रिटर्न वर आधारित कर्ज दिले जाणार असून त्या कर्जाचा वापर ते त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी करू शकणार आहेत.
विशेष म्हणजे व्यावसायिकांच्या सोयीसाठी ही संपूर्ण कर्जाची प्रक्रिया डिजिटल ठेवण्यात आली असून या ऑफरच्या माध्यमातून लहान व्यवसायिकांना आता कमी दरात खेळते भांडवल उपलब्ध होणार आहे.
याबाबत बँकेने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचे नाव डिजिटल लोन कॅनरा ई जीएसटी योजना असे असून या अंतर्गत एमएसएमईना जीएसटी रिटर्न आधारित कार्यरत भांडवल व्यवसाय कर्ज दिले जाणार आहे. तसेच ही कर्जाची प्रक्रिया डिजिटल असणार असून अगदी अर्ज करण्यापासून ते पैसे मिळवण्यापर्यंतची सगळी प्रक्रिया डिजिटल असणार आहे.
कसे राहील कर्जाचे स्वरूप?
या योजनेअंतर्गत एका व्यावसायिकाला दहा लाख रुपयांच्या मर्यादेसह त्याच्या मागील बारा महिन्यांच्या जीएसटी उलाढालीच्या 25 टक्के कर्ज दिले जाणार आहे. म्हणजेच या योजनेअंतर्गत किमान एक लाख रुपयांचे कर्ज दिले जाईल. या योजनेसाठी ते व्यावसायिक पात्र असतील ज्यांचे जीएसटी व्यवहार किमान 75 टक्के चालू खात्याद्वारे केले जातात.
बँकेच्या म्हणण्यानुसार या योजनेअंतर्गत कमी दरात कर्ज दिले जाईल. यासाठी अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल किंवा बँकेच्या शाखेत जाऊन यासंबंधीची माहिती घेऊन देखील अर्ज करता येणार आहे. याबाबत बँकेने सावध करताना म्हटले आहे की, कर्ज देण्याच्या नावाखाली फसवणुकीची अनेक प्रकरणे सध्या उघडकीस आली असून त्यामध्ये फसवणूक करणाऱ्यांनी बँकेच्या काही आकर्षक उत्पादनांची कॉपी करून फसवणूक केली आहे.
त्यामुळे अशा परिस्थितीत फक्त बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन किंवा बँकेच्या शाखेद्वारे संपूर्ण माहिती मिळवून नंतरच अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे देखील आवाहन बँकेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे.