यावर्षी महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने चांगला पाऊस झाल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख जलाशयांमध्ये यावर्षी कमालीचा पाणीसाठा जमा झाला व सगळी धरणे जवळपास शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे शेती आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न जवळजवळ मिटला असून यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे.
अगदी याचप्रमाणे जर आपण अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर पाणलोट क्षेत्राचा विचार केला तर या ठिकाणी देखील जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला व या पावसामुळे या परिसरातील महत्त्वाचे असलेली भंडारदरा, निळवंडे तसेच मुळा धरण जवळपास पूर्ण भरून वसंतून वाहू लागलेत.या धरणाच्या माध्यमातून नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग देखील सोडण्यात आला.

परंतु ही धरणे शंभर टक्के भरली असली तरी मुळा आणि प्रवरा नदीपात्रातील बंधारे मात्र अजून देखील कोरडेठाक असल्याचे चित्र असल्यामुळे पाटबंधारे विभाग नदीपात्रातील हे बंधारे भरण्याचे नियोजन कधी करणार? असा प्रश्न आता या परिसरातील शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
पाटबंधारे विभाग कधी करणार बंधारे भरण्याचे नियोजन ?
जिल्ह्याच्या उत्तर पाणलोट क्षेत्रात जुलै, ऑगस्ट महिन्यांत पावसाने दमदार हजेरी लावल्याने भंडारदरा, निळवंडे, मुळा ही धरणे ओसंडून वाहू लागल्याने धरणांतून, नदीपात्रांतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते.
त्यामुळे जायकवाडी जलाशयही तीन वर्षांनंतर प्रथमच शंभर टक्के भरले. त्यामुळे यंदा रबी आणि उन्हाळ हंगामाची चिंता मिटल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गात सध्या आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. एकीकडे नद्यांवरील ही सर्व धरणे जरी शंभर टक्के भरली असली तरीही मुळा आणि प्रवरा नदीपात्रातील बंधारे मात्र कोरडेठाक असल्याचे चित्र आहे.
प्रवरा नदीवरील आश्वी, चणेगाव, रामपूर, कोल्हार, गळनिंब, मांडवे, केसापूर, वळदगाव, पढेगाव, मालुंजा, भेर्डापूर, वांगी, पाचेगाव, पुनतगाव, मधमेश्वर, तर मुळा नदीवरील डिग्रस, मानोरी, मांजरी, वांजूळपोही, अशी १९ बंधारे कोरडीठाक असून, ती भरण्याची आस सध्या शेतकऱ्यांना लागून आहे.
आठवडाभरापासून घाटमाथ्यावरील पावसाचे प्रमाण अतिशय कमी झाल्याने मुळा आणि निळवंडे धरणांतून नदीपात्रात सोडण्यात येत असलेल्या विसर्गात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. नदीपात्रातील पाणी कमी होत असल्याने पाटबंधारे विभाग नदीपात्रातील बंधारे भरण्याचे नियोजन कधी करणार? अशी चिंता आता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
गुरुवारच्या आकडेवारीनुसार प्रवरा नदीवरील निळवंडे धरणातून ८१० क्युसेक, तर मुळा धरणातून ७०० क्युसेक इतका विसर्ग सुरू होता. मधमेश्वर (नेवासा) येथील बंधाऱ्यातून ३६७ क्युसेक इतकेच पाणी जायकवाडीच्या दिशेने वाहत होते.
प्रवरेवरील सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी साधारण एक टीएमसी, तर मुळा नदीवरील बंधाऱ्यासाठी अर्धा टीएमसी पाणी लागते. ओव्हरफ्लोच्या तून पाण्यातून बंधारे भरले गेले नाहीत, तर धरणाच्या पाण्यातून भरून द्यावे लागतात. त्यामुळे बंधारे भरण्यास धरणातील पाण्याचा वापर केल्यास याचा शेती सिंचनावर मोठा परिणाम र्जणवतो.