Gold Purity Test:- सोने आणि चांदीचे दर पाहिले तर सध्या मोठ्या प्रमाणावर वाढले असून येणाऱ्या कालावधीत देखील सोन्या-चांदीचे दर चढेच राहतील अशी एक शक्यता आहे. त्यामुळे सोने किंवा चांदीची खरेदी करताना बऱ्याच गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते व यामध्ये सोने किंवा चांदी खरेदी करताना ते कितपत शुद्ध आहे? या दृष्टिकोनातून काळजी ही खूप महत्त्वाची ठरते.
यामध्ये जर उदाहरणच घ्यायचे झाले तर सोन्याचे 24 कॅरेट तसेच 22, 18 कॅरेट असे प्रकार असतात व यामध्ये 24 कॅरेट सोने हे सर्वात शुद्ध स्वरूपाचे असतं. परंतु यामधील वास्तविकता अशी आहे की 24 कॅरेट सोन्यापासून दागिने बनवता येत नाही कारण ते खूप मऊ असते.

परंतु तुम्हाला जर एखादा ज्वेलर्स सांगत असेल की तो 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे दागिने तुम्हाला देत आहे तर तो तुमची शुद्ध फसवणूक करत आहे. सोन्याचे दागिने बनवायचे असतील तर साधारणपणे 14 ते 22 कॅरेट सोन्याचा वापर केला जातो यामध्ये 91.6% पर्यंत कमाल सोने असते.या व अशा अनेक गोष्टींमध्ये सोने खरेदी करताना तुम्हाला जर सोने व चांदीची शुद्धता ओळखायची असेल तर तुम्ही अगदी घरच्या घरी काही पद्धती वापरून तपासू शकतात.
घरच्या घरी अशाप्रकारे तपासा सोन्याची शुद्धता
1- तुमच्याकडे असलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर व्हिनेगरचे काही थेंब टाकावेत. काही कालावधीनंतर जर सोन्याचा रंग बदलला नाही तर ते शुद्ध सोने आहे असे समजावे.
2-दागिन्यांवर चुंबक ठेवावे आणि जर चुंबक दागिन्यांना चिकटत नसेल तर ते शुद्ध सोने आहे असे समजावे.
3- तसेच सिरॅमिक दगडावर सोन्याचे दागिने घासून घ्यावे. तर त्या ठिकाणी असलेले चिन्ह सोनेरी असेल तर सोने खरे आहे असे समजावे.
4- एका मोठ्या भांड्यात पाणी भरून त्यात सोन्याचे दागिने ठेवावेत. जर सोने पाण्यामध्ये बुडाले तर ते सोने शुद्ध किंवा खरे आहे असे समजावे. खरे सोने कितीही हलके किंवा कितीही प्रमाणात असले तरी ते पाण्यात बुडते.
घरबसल्या चांदीची शुद्धता तपासण्यासाठी वापरा या पद्धती
1- आईस क्युब टेस्ट– चांदीच्या दागिन्यांवर बर्फाचा तुकडा ठेवावा व यामध्ये जर बर्फ लवकर वितळला तर चांदी खरी आहे. कारण चांदीमध्ये असलेली थर्मल कंडक्टिव्हिटी बर्फ पटकन वितळवते.
2- चुंबक टेस्ट– चांदी चुंबकाला आकर्षित करत नाही. चुंबकाकडे जर दागिने आकर्षित होत असतील तर चांदी बनावट असते.
3- ब्लिच टेस्ट– चांदीच्या दागिन्यांवर ब्लीचचा एक थेंब टाकावा. जर थेंबाचा रंग लगेच काळा झाला तर चांदी अस्सल आहे असे समजावे.
4- हॉलमार्क चेक करावे– अस्सल चांदीच्या दागिन्यांवर 925 हॉलमार्क स्टॅम्प, बीआयएस मार्क तसेच निर्मात्याचे चिन्ह असते. अशा प्रकारच्या मार्किंग तुम्ही भिंगाने पाहू शकता.
5- आवाज ऐकून तपासा– चांदीचे नाणे जमिनीवर टाकावे व जमिनीवर टाकल्यानंतर जर त्या नाण्याचा आवाज घंटी सारखा आला तर ते खरे चांदीचे नाणे आहे असे समजावे.













