Ahmednagar Name Changed : लवकरच विधानसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महायुती सरकारने गेल्या काही दिवसांमध्ये अनेक धडाडीचे निर्णय घेतले आहेत. समाजातील सर्वच घटकांना खुश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशातच, आता अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे.
खरे तर आज दिनांक 4 ऑक्टोबर 2024 हा दिवस नगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी मोठा ऐतिहासिक ठरला आहे. अहमदनगर जिल्हा आता अहिल्यानगर म्हणून ओळखला जाणार आहे. जिल्ह्याचे नाव बदलावे अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती.
जेव्हा औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्यात आले तेव्हापासून या मागणीने अधिक जोर पकडला. या दोन्ही जिल्ह्यांचे नाव चेंज झाल्यानंतर अहमदनगरचे नाव चेंज व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा सुरू झाला.
अशातच गेल्या वर्षी चौंडी येथे झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरच्या नामकरणाची मोठी घोषणा केली. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनानिमित्त चौंडी येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी अहमदनगरचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे करण्याची घोषणा केली होती.
पुढे राज्य शासनाने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता दिली अन हा प्रस्ताव केंद्र दरबारी मान्यतेसाठी पाठवला. दरम्यान आता केंद्र सरकार दरबारी पाठवण्यात आलेल्या राज्य शासनाच्या या प्रस्तावावर केंद्रातील मोदी सरकारने निर्णय घेत याला मंजुरी दिली आहे.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्याच्या प्रस्तावाला मोदी सरकारने मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल मीडियावर याविषयीची माहिती दिली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या अधिकृत एक्स हॅण्डलवर असे म्हटले आहे की, “नगर जिल्ह्याचे नामांतर अहील्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजूरी दिली.आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचे नामकरण अहील्यानगर करण्यास मान्यता मिळाल्याने वचनपूर्ती झाल्याचा मनस्वी आनंद आहे.
निर्णय होण्याकरीता सहकार्य करणारे विश्वनेते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शहाजी, मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब जी, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी आणि उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार जी यांचे आभार.” आम्ही आपणास सांगू इच्छितो की, राज्य शासनाने जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर असे करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच येथील रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याच्या हालचालींना वेग आला.
गेल्या महिन्यात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत येथील रेल्वे स्थानकाचे नाव बदलले जाणार असे सांगितले होते. केंद्रीय रेल्वेमंत्री असलेली वैष्णव यांच्या या घोषणेनंतर केंद्र सरकार लवकरच जिल्ह्याच्या नामकरणाचा प्रस्तावाला मंजुरी देणार असे स्पष्ट झाले होते.
त्यानुसार आता केंद्रातील मोदी सरकारने जिल्ह्याच्या नामांतरणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची नामांतरणाची मागणी या आज पूर्ण झाली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांच्या चेहऱ्यावर कमालीचे समाधान पाहायला मिळत आहे.