Success Story:- एखादी गोष्ट जर तुम्हाला आयुष्यामध्ये साध्य करायचे असेल तर त्याकरता तुमचे संपूर्णपणे समर्पण खूप आवश्यक असते. तुम्हाला जी गोष्ट साध्य करायचे आहे तोपर्यंत अखंडपणे मेहनत करत राहणे व सातत्य ठेवणे खूप गरजेचे असते.
ध्येयाकडे वाटचाल करताना जर कितीही विपरीत परिस्थिती आली तरी देखील तिच्याशी दोन हात करून मार्ग काढणे खूप महत्त्वाचे असते व तेव्हाच व्यक्ती कुठे ध्येयापर्यंत पोहोचते. त्यातल्या त्यात आयुष्यातील चांगल्या पगाराची नोकरी असेल आणि ती नोकरी सोडून जर एखादा व्यवसायात पडायचे ठरवले तर हा एक जोखीम युक्त असा निर्णय ठरू शकतो.

परंतु असे बरेच उदाहरण आपल्याला दिसून येतील की चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडून व्यवसायाची वाट धरून प्रयत्नाने आणि मेहनतीने व्यवसाय आज यशाच्या शिखरावर पोचवले आहेत. याच मुद्द्याला धरून जर आपण नवनीत सिंग या तरुणाचे यशोगाथा बघितली तर ती प्रेरणादायी अशीच आहे.
नवनीत सिंग यांची प्रेरणादायी यशोगाथा
नवनीत सिंग यांचा जन्म आणि त्यांचे बालपण बेगूसराय या छोट्याशा गावामध्ये गेले. विशेष म्हणजे सामान्य कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला होता व त्यांचे गाव देखील एवढे मागासलेले होते की त्या ठिकाणी पक्के रस्ते तसेच विज यासारख्या मूलभूत सोयी सुविधा देखील नव्हत्या.
अशा विपरीत परिस्थितीमध्ये नवनीतने मोठ्या जिद्दीने शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीचे शिक्षण त्यांनी केंद्रीय विद्यालय बेगूसराय येथून पूर्ण केले आणि त्यानंतर बेंगलोरच्या एम एस रामय्या कॉलेजमधून ह्युमन रिसोर्स मध्ये एमबीए पूर्ण केले. इतक्यावरच न थांबता त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद येथून सर्टिफिकेट कोर्स केला.
या ठिकाणहून नवनीत सिंग यांच्या करिअरला नवी दिशा मिळाली. एमबीए पूर्ण केल्यानंतर त्यांना फ्लिपकार्ट मध्ये एचआर एक्झिक्यूटिव्हची नोकरी मिळाली तेव्हा त्यांनी दिल्ली आणि बेंगलोर कार्यालयामध्ये 2015 पर्यंत काम केले.
त्यानंतर ओला कॅबमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून देखील नोकरी पत्करली व ही नोकरी देखील सोडली व स्विगीमध्ये वरिष्ठ सल्लागाराची नोकरी मिळवली. परंतु हा सगळा नोकऱ्यांचा प्रवास सुरू असताना मात्र मनात व्यवसाय करायचे चालू होते व नेमका कोणता व्यवसाय सुरू करावा याची घालमेल मनात होती.
अशा पद्धतीने सुरू केला व्यवसाय
या सगळ्या घडामोडीनंतर मात्र तीन मित्रांसोबत 15 लाख रुपयांचे भांडवल त्यांनी उभे केले व एसपीएनएन बिजनेस प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी रजिस्टर केली व अनेक अडचणींना तोंड देत या कंपनीचा प्रवास सुरू केला.
त्यांनी स्थापन केलेल्या या कंपनीने हळूहळू ब्लू कॉलर नोकऱ्या मिळवून देण्यासाठी सेवा सुरू केली व यामध्ये पुरवठा साखळी, विक्री कर्मचारी आणि नेतृत्व नियुक्ती यासारख्या भूमिकांचा मोठा समावेश होता. नवनीत सिंग यांची कंपनी नोकरीच्या प्रकार आणि अनुभवावर अवलंबून असलेल्या कंपनीकडून दोन ते बारा टक्क्यांपर्यंत व्यवस्थापन शुल्क सध्या आकारते.
सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे कंपन्यांना कामगार किंवा कर्मचारी पुरवण्याचे काम नवनीत सिंग यांची कंपनी करते. सध्या नवनीत यांना कष्टाचे फळ मिळाले असून त्यांच्या कंपनीचे आज उलाढाल पाचशे कोटी रुपयांच्या घरात आहे.
विशेष म्हणजे त्यांच्या कंपनीचे प्रमुख ग्राहकांमध्ये ॲमेझॉन, फ्लिपकार्ट तसेच रिलायन्स, टाटा, क्रोमा तसेच बिग बास्केट आणि फोन पे सारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. नवनीत सिंग यांच्या कंपनीचे मुख्य कार्यालय गुरुग्राम हरियाणा येथे असून या ठिकाणी 60 ते 70 कर्मचारी नोकरी करतात. विशेष म्हणजे नवनीत सिंग यांची कंपनी आज अमेझॉन आणि फ्लिपकार्ट साठी तिसरी सर्वात मोठी मनुष्यबळ पुरवणारी कंपनी मानली जाते.













