Sujay Vikhe Patil News : लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून आत्तापासूनच तयारी सुरू करण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही सध्या अशीच परिस्थिती आहे.
जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 12 मतदार संघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांचे दौरे वाढले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपावर मंथनही सुरू आहे. शासनाच्या माध्यमातून विविध विकास कामांचे शुभारंभही केले जात आहेत.
दरम्यान अशाच एका शुभारंभ कार्यक्रमात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आपल्या पराभवाची खदखद व्यक्त केली आहे. अहिल्यानगर तालुक्यातील पिंपळगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी माजी आमदार शिवाजी कर्डीले अन माजी खासदार सुजय विखे पाटील हे मंचावर उपस्थित होते. यावेळी बोलतांना सुजय विखे पाटील यांनी खासदार निलेश लंके यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
विखे पाटील म्हणालेत की, ‘मी कुठे गेलेलो नाही, संपलेलो नाही टायगर अभी जिंदा है ! असे अनेक वादळ येत असतात. पण, सध्याच्या निवडून आलेल्या माणसाच्या भाषणा मध्ये कधीच समाजहिताच काम दिसत नाही, शेतकऱ्यांच्या हिताच काम नाही, परिवर्तन व्हावं असं कधीच ऐकायला मिळत नाही.
फक्त हा बोगस, याला गाडू, तो हरामखोर फक्त एवढंच. तुम्ही कसं मतदान टाकता? असं म्हणतं सुजय विखे पाटील यांनी कार्यक्रमाला उपस्थित लोकांना कानपिचक्या दिल्यात. सुजय विखे म्हणालेत आज जी गर्दी आहे त्यातल्या निम्म्या लोकांनी माझा कार्यक्रम लावलाय.
पण मी तुमच्या मध्ये आलोय. तसेच, कार्यक्रम माझा नाही तर तुमच्या पुढच्या पिढीचा कार्यक्रम तुम्ही लावलाय, माझ्या पडण्याने नुकसान तुमच्या लोकांच झाल आहे, अशी प्रतिक्रिया माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली आहे.
खरंतर नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटील यांचा अनपेक्षित पराभव झाला. साऱ्यांना वाटत होते की सुजय विखे पाटील पुन्हा एकदा विजयी होणार आणि संसदेत नगर दक्षिणेचे प्रतिनिधित्व करणार.
पण लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा पराभव केला. याच पराभवावर भाष्य करताना पिंपळगाव येथील विविध विकास कामांच्या शुभारंभ दरम्यानच्या भाषणात माजी खासदार विखे पाटील यांनी हे विधान केले आहे.