अहिल्यानगर ते पुणे महामार्ग हा महामार्ग आहे की मृत्यूचा सापळा? वालुंबा नदीवरील पुलाचा संरक्षक कठडा तुटल्याने अपघाताची शक्यता

Ahilyanagar News: दररोज जर आपण रस्ते अपघातांची संख्या पाहिली तर ती दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून येत आहे. या अपघातांमध्ये वाहन चालकांची बेफिकिरी प्रवृत्ती किंवा त्यांची चुकी जितकी कारणीभूत नसेल तितक्या प्रमाणात रस्त्यांची झालेली दुरवस्था कारणीभूत ठरते.

राज्यातील बरेच रस्त्यांची अवस्था खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशा पद्धतीची झाल्यामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याची स्थिती आहे. त्यामुळे रस्ते अपघातांच्या प्रमाणात वाढ होऊन नाहकच निरपराध नागरिकांचे जीव जात आहेत. अगदी रस्त्यांची दुरवस्थेच्या दृष्टिकोनातून बघितले तर अहिल्यानगर ते पुणे महामार्ग देखील सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

या महामार्गावरील कामरगाव येथे असलेल्या वालुंबा  नदीवरील पुलाचा संरक्षक कठडा तुटल्यामुळे या ठिकाणी एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

त्यामुळे या तुटलेल्या कठड्याचे काम येणाऱ्या आठ दिवसात पूर्ण करावे,अन्यथा महामार्गावरच आंदोलन करण्याचा इशारा कामरगावचे सरपंच तुकाराम कातोरे यांच्यासह इतर जणांनी दिला आहे.

 अहिल्यानगर ते पुणे महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

अहिल्यानगर-पुणे महामार्गावर कामरगाव (ता. अहिल्यानगर) येथे वालुंबा नदीवरील पुलाचा संरक्षक कठडा तुटल्याने येथे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तेथे जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या कठड्याचे काम ८ दिवसांत पूर्ण करावे; अन्यथा, महामार्गावरच आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कामगारगावचे सरपंच तुकाराम कातोरे, लक्ष्मण श्यामराव ठोकळ, संतोष साठे, योगेश ठोकळ, यश ठोकळ, फय्याज पठाण यांनी दिला आहे.

कामरगावच्या उत्तरेला वालूंबा नदीवर अहिल्यानगरहून पुण्याकडे जाताना मोठा पूल आहे. तेथे वारंवार अपघात होतात. दोन महिन्यांपूर्वी मालवाहू ट्रक संरक्षक कठडा तोडून नदीपात्रात कोसळल्याने ८० फुटांचा कठडा तुटला आहे. येथे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता आहे.

पुणे महामार्गावरून दररोज हजारो वाहने व प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांचे व वाहनांचे दळणवळण सुलभ व्हावे, याची जबाबदारी चेतक एंटरप्राइज या कंपनीची आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे त्यावर नियंत्रण आहे. परंतु, दोन महिने झाले तरी प्रशासन त्याकडे डोळेझाक करीत आहे.

यात निष्पाप जिवांच्या जीवन- मरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.पुलाच्या मागे तीव्र गोलाकार उतार असून, वाहन चालकांना वाहनावर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. या ठिकाणी वारंवार अपघात होतात.

तसेच पुलाच्या पाठीमागे योगेश ठोकळ यांच्या घरासमोरील शंभर फुटांचा संरक्षक कठडा तुटल्याने तेथे यापूर्वी पाच सहा वाहने रस्त्याच्या विरुद्ध बाजूला पडली आहेत त्याकडे प्रशासन लक्ष देत नाह कठड्याची झालेली दुर्दशा पाहण्यासाठी सरपंच तुकाराम कातों लक्ष्मण श्यामराव ठोकळ, योगेश ठोकळ, संतोष साठे, फैयाज पठाण यश ठोकळ यांनी पुलाच्या कठड्याच् पाहणी केली.