अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- दैठणेगुंजाळ (ता. पारनेर) येथील विकास सेवा संस्थेकडून शेतकर्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचा आरोप करीत शेतकर्यांना तातडीने पीक कर्ज देण्याच्या मागणीसाठी जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीने पारनेर तालुका उपनिबंधक सुखदेव सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष वजीर सय्यद, जिल्हाध्यक्ष अंकुश ठोकळ, संपर्क प्रमुख गणेश निमसे, पारनेर तालुकाध्यक्ष रावसाहेब झांबरे आदि उपस्थित होते. विकास सेवा संस्थेकडून शेतकर्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ होत आहे.
सोसायटीचे सभासद मल्हारी झांबरे यांनी सोसायटीमार्फत वेळोवेळी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून वेळोवेळी खरीप हंगामचे नवीन पीक कर्ज मिळावे यासाठी संस्थेत मागणी केली होती. तरी त्यांना पीक कर्ज देण्यात आलेले नाही. मागील तीन महिन्यापासून मल्हारी झांबरे या संदर्भात पाठपुरावा करीत आहे.
मात्र अद्यापि यासंदर्भात कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. सेवा संस्थेचे चेअरमन, संचालक मंडळ तसेच कार्यकारी सचिव यांच्याकडून पीक कर्ज मिळावे याबाबत चौकशी केली असता कोणतेही समाधानकारक उत्तर देण्यात आलेले नाही. पीक कर्ज मंजूर करण्यासंदर्भात शासनाचे स्पष्ट आदेश असतानाही राजकीय द्वेषापोटी शेतकर्यांवर अन्याय होत
असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन सर्व सभासदांना न्याय मिळावा व शेतकर्यांना पीक कर्ज तातडीने मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर प्रश्न न सुटल्यास येत्या आठ दिवसात संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved