डॉ. सुजय विखे यांची पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला हजेरी आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची जरांगेंशी भेट; काय असू शकते कनेक्शन?

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून 20 नोव्हेंबर 2024 या दिवशी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी मतदान पार पडणार आहे तर या निवडणुकीचा निकाल हा 23 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर केला जाणार आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राजकीय पातळीवर खूप मोठ्या घडामोडी घडताना आपल्याला दिसून येत आहे. यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती त्याच्यामध्ये राजकीय संघर्ष आहेच.परंतु आता राज्यात राजू शेट्टी तसेच बच्चू कडू आणि छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी देखील या निवडणुकीत सहभागी होत असल्याकारणाने या निवडणुकीची रंगत आणखीनच वाढणार असल्याचे दिसून येणार आहे.

त्यातल्या त्यात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे याकरता गेल्या 14 महिन्यांपासून झटणारे मनोज जरांगे पाटील यांनी देखील काही उमेदवार पाडण्याबाबत वक्तव्य केले असून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने न घेतल्यामुळे अनेक सत्ताधारी आणि विरोधकांनी या सगळ्या गोष्टीचा धसका घेतल्याचे चित्र आहे.

त्यामुळे आंतरवाली सराटीमध्ये नामवंत असे अनेक नेते मनोज जरांगे  यांची भेट घेत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. विशेष म्हणजे या नेत्यांमध्ये राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी मध्यरात्री दोन वाजता मनोज जरांगेंची भेट घेतली. त्यांची ही भेट सरकारच्या माध्यमातून किंवा सरकारच्या वतीने घेतली गेल्याचे बोलले जात आहे.

परंतु या भेटी मागील वेगळेच कारण मात्र राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला आले असल्याचे दिसून येत आहे. नुकताच पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते व या दसरा मेळाव्याला डॉ. सुजय विखे यांनी हजेरी लावल्यानंतर त्यांच्याबरोबर कुटुंबियांच्या विरोधात सोशल मीडियावर मराठा समाजात तीव्र रोष दिसून आला.

त्यामुळे मराठा समाजाचा हा रोष विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परवडणारा नसल्याकारणाने मंत्री राधाकृष्ण विखेंकडून जरांगेंची भेट घेतल्याचा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेला जात आहे.

 20 ऑक्टोबरला होणाऱ्या बैठकीत जरांगे घेणार महत्त्वाची भूमिका?

गेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा फटका अनेक दिग्गज नेत्यांना बसला. त्यानंतर आता विधानसभा निवडणूक होणार आहे व या पार्श्वभूमीवर सरकारच्या माध्यमातून हा मुद्दा सोडवला गेला नसल्यामुळे मनोज जरांगे आता काहीतरी वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.

20 ऑक्टोबरला याबाबत ते आता निर्णायक भूमिका ठरवतील व यामध्ये उमेदवार उभे करायचे की उमेदवार पाडायचे याविषयी निर्णय होण्याची शक्यता आहे.

लोकसभेमध्ये मराठा समाजाची जी ताकद दिसली त्यापेक्षा या विधानसभेत ती जास्त प्रमाणात दिसेल असा विश्वास जरांगे यांना आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये बीड मतदार संघात जे चित्र दिसले त्याची पुनरावृत्ती आपापल्या मतदारसंघात दिसून येऊ नये याकरिता  अनेक नेते जरांगे यांना भेटत असून आपापली भूमिका स्पष्ट करत  असल्याचे बोलले जात आहे.

 विधानसभेत फटका बसण्याची भीती

झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये डॉ. सुजय विखे यांना पराभव पत्करावा लागला. परंतु आता सुजय विखे विधानसभेकरिता संगमनेर किंवा राहुरी मतदार संघातून विधानसभा लढवतील अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकारची चाचपणी देखील त्यांच्या माध्यमातून सुरू आहे.

स्वतः मंत्री राधाकृष्ण विखे पाटील राहता मतदारसंघात प्रतिनिधित्व करत आहेत. परंतु दसरा मेळाव्याला हजेरी लावल्यानंतर मराठा समाज सोशल मीडियावर सूजय विखे यांच्या विरोधात आक्रमक असताना सुजय विखे हे जर संगमनेर किंवा राहुरीतून निवडणुकीस उभे राहिले तर त्याचा काही प्रमाणात फटका बसू शकतो अशी भीती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना वाटत असल्यामुळेच मराठा समाजाचा हा रोष कमी करण्याची गरज असल्याचे आता बोलले जात आहे.

म्हणूनच की काय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली अशी चर्चा सध्या सुरू आहे.परंतु डॉ. सुजय विखे पाटील यांना भाजपच्या माध्यमातून तिकीट मिळणार नाही अशा पद्धतीच्या बातम्या देखील माध्यमातून येत आहेत. त्यामुळे आता डॉ. सुजय विखे यांना विधानसभेचे भाजप कडून तिकीट मिळणार की नाही? हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईलच.