Kopargaon News : कोपरगाव विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रात नेहमीच चर्चेचा राहिला आहे. या विधानसभा मतदारसंघात नेहमीच अटीतटीची लढत पाहायला मिळते. काळे आणि कोल्हे हे या विधानसभा मतदारसंघाचे दोन परंपरागत विरोधक आहेत. हे दोघेही परिवार शुगर लॉबी मधून येतात. मात्र, यावेळी काळे आणि कोल्हे हे दोन्हीही कट्टर राजकीय विरोधक एकाच गटात आहेत. हे दोन्ही सध्या महायुतीचा भाग आहेत.
तथापि, येत्या विधानसभा निवडणुकीत देखील काळे आणि कोल्हे असाच सामना पाहायला मिळणार असे म्हटले जात आहे. कोल्हे हाती तुतारी घेऊन काळे यांच्या विरोधात दंड थोपटतील अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोर धरत आहेत. महत्वाचे म्हणजे भाजपाचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट सुद्धा घेतली होती.
त्यांनी शरद पवार यांच्यासमवेत एकाच गाडीने प्रवास सुद्धा केला होता. मात्र आता कोल्हे परिवाराने या निवडणुकीत थांबण्याचा निर्णय घेतला असल्याच्या चर्चांनी जोर पकडला आहे. विधानसभा निवडणुकीत आपल्याला परंपरागत तुल्यबळ राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या कोल्हे परिवारातील सदस्यांच्या विरोधात निवडणूक लढवावी लागेल असे गृहीत धरून काळे यांनी गेली पाच वर्षे विकासकामे आणि जनसंपर्क वाढवण्यावर विशेष भर दिलाय.
मात्र आता निवडणुकीचा काळ जवळ आला असतानाच कोल्हे हे माघार घेऊ शकतात अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. कोल्हे भारतीय जनता पक्षातून बाहेर पडतील आणि शरद पवार गटात जाऊन आगामी विधानसभा निवडणुकीत तुतारी हाती घेत काळे यांना आव्हान देतील हे जवळपास फिक्स समजले जात आहे.
पण आता कोल्हे यांनी थांबण्याचा निर्णय घेतला असल्याच्या चर्चांनी जोर पकडला असल्याने नेमके पडद्यामागे काय घडते आहे? देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हे यांना काही नवीन ऑफर दिली आहे का? हे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. पण जर कोल्हे यांनी खरंच थांबण्याचा निर्णय घेतला तर काळे यांना नक्कीच मोठे बळ मिळणार आहे.
कोल्हे जर निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेच नाहीत तर कोपरगावचा गड शाबूत राखण्यात काळे यांना फार मोठे आव्हान राहणार नसल्याचे मत राजकीय विश्लेषकांकडून सुद्धा व्यक्त केले जात आहे. खरेतर काळे आणि कोल्हे हे दोन्ही शुगर लॉबी मधील नेते. शुगर लॉबी मध्ये असल्याने काळे आणि कोल्हे परिवाराची मतदार संघात गाव पातळीवर घट्ट पकड आहे.
त्यामुळे काळे आणि कोल्हे यांच्यात लढत झाली तर काटेदार लढत होणार आहे. पण सध्या ज्या चर्चा सुरू आहेत त्यानुसार जर कोल्हे यांनी थांबण्याचा निर्णय घेतला तर यामुळे काळे यांचा मार्ग सोपा होऊ शकतो. मात्र कोल्हे यांच्याबाबत ज्या चर्चा सुरू आहेत त्या राजकीय विश्लेषकांच्या देखील पचणी पडत नाहीयेत.
यामुळे कोपरगाव विधानसभा मतदारसंघात आगामी काळात नेमकं काय घडणार, आत्तापर्यंत काळे यांच्या विरोधात दंड थोपटणारे कोल्हे खरंच थांबण्याचा निर्णय घेणार का? अन जर त्यांनी खरच असा निर्णय घेतला तर याच नेमक कारण काय असेल? या गोष्टी पाहण्यासारख्या ठरणार आहेत.