Ahilyanagar News:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचे सूत्र जवळपास निश्चित झाले असून थोड्याफार जागांवर अजून तिढा बाकी असल्याची माहिती समोर आलेली आहे. परंतु आज किंवा उद्यामध्ये या राहिलेल्या जागांवरील तिढा संपुष्टात येईल व जागावाटप पूर्ण केले जाईल अशी शक्यता आहे.
या अनुषंगाने जर आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी महाविकास आघाडी कडून विद्यमान आमदार लहू कानडे यांना उमेदवारी मिळेल शक्यता असताना मात्र हेमंत ओगले यांनी देखील उमेदवारी मागितले असल्याने त्या ठिकाणी महाविकास आघाडीत तिढा निर्माण होऊन बंडखोरी होते की काय अशी एक शक्यता आहे.
महाविकास आघाडी सोबतच या ठिकाणी महायुतीकडून देखील अजून उमेदवार देण्यात आलेला नाही.परंतु महायुती माजी खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देईल अशी एक शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून मात्र अजून देखील उमेदवारांबाबत निश्चिती झाल्याचे दिसून येत नाही.
श्रीरामपूर मधून महायुतीचे उमेदवार असणार माजी खासदार सदाशिव लोखंडे?
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून बघितले तर या ठिकाणी माजी खासदार सदाशिव लोखंडे यांना महायुतीकडून उमेदवारी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. परंतु महाविकास आघाडी कडून मात्र विद्यमान आमदार लहू कानडे यांना उमेदवारी मिळते की हेमंत ओगले यांना उमेदवारी दिली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
एखाद्या वेळेस महाविकास आघाडी या दोघांना डावलून तिसऱ्या कुणाला उमेदवारी देते याबाबत मतदारसंघांमध्ये कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. 22 तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघांमधून अजून प्रबळ दावेदार असलेल्या एकाही उमेदवारांनी अर्ज भरलेला नाही.
महायुतीच्या माध्यमातून माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव प्रशांत लोखंडे यांनी देखील भरपूर प्रयत्न केल्याचे दिसून येते. परंतु त्यांच्या ऐवजी सदाशिव लोखंडे यांना पक्षाच्या माध्यमातून पसंती दर्शवली असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. महाविकास आघाडीमध्ये श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसकडे असून या ठिकाणचे विद्यमान आमदार काँग्रेसचेच आहेत.
त्यामुळे आपल्याला उमेदवारी मिळणार नाही म्हणून सदाशिव लोखंडे यांच्या खासदारकीच्या निवडणुकी वेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी ठाकरे शिवसेनेचे साथ सोडून विधानसभेची उमेदवारी देण्याचा शब्द घेत शिंदे सेनेत प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी सदाशिव लोखंडे यांचे पूर्ण काम केले.
परंतु या निवडणुकीत सदाशिव लोखंडे यांचा पराभव झाला. या सगळ्यामुळे आता भाऊसाहेब कांबळे यांना अपेक्षा आहे की विधानसभेला उमेदवारी मिळेल. परंतु मध्येच महायुतीकडून उमेदवारीसाठी लोखंडे पिता पुत्रांनी प्रयत्न चालवल्याचे पाहून भाऊसाहेब कांबळे यांच्या पुढे मात्र अडचण निर्माण झालेली आहे.
त्यातच आता सदाशिव लोखंडे यांना उमेदवारीच्या संदर्भात महायुतीकडून हिरवा कंदील मिळाल्याच्या बातम्या आल्यामुळे या ठिकाणाहून भाऊसाहेब कांबळे यांचा हिरमोड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महाविकास आघाडीत देखील तीच गत
महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून बघितले तर हेमंत ओगले यांनीही उमेदवारी करिता काँग्रेसकडे सर्व स्तरातून ताकद लावल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे साहजिकच विद्यमान आमदार लहू कानडे यांच्या पुढे अडचणी वाढलेले आहेत.
ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी लहू कानडे यांच्या उमेदवारीला संवाद मिळाव्याच्या माध्यमातून हिरवा कंदील दिलेला होता व त्यामुळे लहू कानडे यांचे समर्थक आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा दावा करत आहेत. इतकेच नाहीतर या निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टिकोनातून लहू कानडे यांच्या गटाने काही दिवसांपूर्वी बुथ समित्या तयार केल्या व त्यांच्या बैठका देखील घेतल्या.
त्या पाठोपाठ आता हेमंत ओगले यांनी देखील बुथ समित्या तयार करून बैठकी घेतल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे हेमंत ओगले आणि लहू कानडे यांच्यामध्ये उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच असल्याचे दिसून येत आहे. परंतु बाळासाहेब थोरात यांनी दोन्ही गटाचा वाद संपुष्टात आणल्याची चर्चा देखील समोर येत आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर आता दोघांपैकी कुणाला उमेदवारी मिळणार का बंडखोरी होणार? हे आता पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यातच श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून अनेक जण अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्यामुळे अपक्षांना देखील तोंड देण्याचे मोठे आवाहन महायुतीसह महाविकास आघाडी पुढे असणार आहे.