अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ 2 विधानसभा मतदारसंघातून 3 उमेदवारांनी माघार घेतली !

Published on -

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे. याशिवाय जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी सादर करणाऱ्यांची संख्या देखील खूपच लक्षणीय आहे.

ज्या उमेदवारांना महायुतीकडून आणि महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळाली नाही त्या उमेदवारांच्या माध्यमातून अपक्ष अर्ज सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यात अपक्ष उमेदवारी केलेले अनेक उमेदवार असे आहेत ज्यांचे प्रमुख उमेदवारांच्या नावाशी साधर्म्य आढळले आहे.

दरम्यान, आता निवडणुकीतून कोण कोण माघार घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. खरेतर उमेदवारी अर्जांची बुधवारी छाननी झाल्यानंतर अवघा दीड दिवसाचा कालावधी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आहे.

मात्र आत्तापर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यातील फक्त तीन अपक्ष उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यात अपक्षांचा तोरा कायम असल्याचे दिसते. अपक्ष उमेदवारांची मनधरणी करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी मधील घटक पक्षांच्या माध्यमातून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

मात्र अजून तरी प्रमुख पक्षांच्या या मन धरणीच्या कार्यक्रमाला अपेक्षित यश मिळाले नसल्याचे दिसत आहे. तथापि अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघातून आणि कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून तीन अपक्ष उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला असल्याची माहिती आयोगाकडून हाती आली आहे.

कोणी कोणी उमेदवारी अर्ज मागे घेतला
मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील राहुरी मतदारसंघातील बाबासाहेब पंढरीनाथ जुंधारे (रा. मांजरी) आणि अरुण बाबुराव तनपुरे (रा. तनपुरे गल्ली, राहुरी) या दोन अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.

यासह कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून रोहित सुरेश पवार (रा. सुपे, पो. बहिरोबाचीवाडी, ता. कर्जत) यांनीही अर्ज मागे घेतला आहे.

मात्र कोपरगाव, श्रीरामपूर, शेवगाव, अहमदनगर शहर, शिर्डी, नेवासे, पारनेर, श्रीगोंदे, अकोले, संगमनेर या विधानसभा मतदारसंघातील

अपक्षांनी अजून उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. यामुळे या विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार अर्ज मागे घेणार की नाही याकडे साऱ्यांचे लक्ष राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe