एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रातील जनतेचा कौल कोणाला? महायुती की महाविकास आघाडी, पहा…..

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात लोकांनी चांगला जनादेश दिला होता. यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील जनता आमच्या बाजूनेच कौल देणार असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे महायुतीकडून देखील गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील सरकारने सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांच्या जोरावर महायुती पुन्हा सत्तेत येणार असा विश्वास व्यक्त होतोय.

Tejas B Shelar
Updated:
Maharashtra Assembly Election Exit Poll

Maharashtra Assembly Election Exit Poll : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया संपन्न झाली. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात विधानसभा निवडणुकीची चर्चा होती. आज निवडणुकीसाठीच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता येत्या 23 तारखेला मतमोजणी होणार आहे. मतमोजणीनंतरच महाराष्ट्रात कोणाचे सरकार येणार हे स्पष्ट होणार आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात लोकांनी चांगला जनादेश दिला होता. यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील जनता आमच्या बाजूनेच कौल देणार असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे.

दुसरीकडे महायुतीकडून देखील गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील सरकारने सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांच्या जोरावर महायुती पुन्हा सत्तेत येणार असा विश्वास व्यक्त होतोय.

मात्र येत्या तीन दिवसांनी अर्थातच 23 नोव्हेंबरला जेव्हा मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईल तेव्हाच महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येणार की महायुती आपली सत्ता अबाधित राखणार हे स्पष्ट होऊ शकणार आहे.

याआधी मात्र राज्यातील जनतेचा कल काय असू शकतो याचे एक्झिट पोल यायला सुरुवात झाली आहे. हे एक्झिट पोल तंतोतंत खरे ठरत नाहीत पण त्यातून जनतेचा कल कुठल्या दिशेने आहे, याचा अंदाज लावला जात असतो.

त्यामुळे या एक्झिट पोलकडे साऱ्या महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष असते. खरेतर महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी 145 आमदारांचे संख्याबळ आवश्यक असते. यामुळे कोणते आघाडी महाविकास आघाडी की महायुती कोण या मॅजिकल फिगर पर्यंत पोहोचते याकडे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे. आता आपण एक्झिट पोल मध्ये जनता कोणाच्या बाजूने कौल देतांना दिसते हे समजून घेणार आहोत.

एक्झिट पोल काय सांगतो

इलेक्ट्रोल एजच्या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असणाऱ्या काँग्रेस पक्षाला 60, शरद पवार गटाला 46, ठाकरे गटाला 44 जागा मिळू शकतात. तसेच महायुतीमधील भारतीय जनता पक्षाला 78, शिवसेना शिंदे गटाला 26 आणि अजित पवार गटाला 14 जागा मिळण्याची शक्यता यामध्ये वर्तवण्यात आली आहे. शिवाय इतर पक्ष व अपक्षांना मिळून 20 जागा मिळण्याची शक्यता यात वर्तवली गेली आहे. म्हणजेच महायुतीला 121 महाविकास आघाडीला 150 आणि इतरला 20 जागा मिळू शकतात असा अंदाज या पोलमध्ये वर्तवला गेला आहे. अर्थातच या एक्झिट पोल नुसार राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येण्याची शक्यता आहे. नक्कीच, या पोल मध्ये सांगितलेली आकडेवारी जर प्रत्यक्षात खरी ठरली तर महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

पोल डायरी या एक्झिट पोल नुसार महायुतीला 122 ते 186 जागा आणि महाविकास आघाडीला 69 ते 121 जागा मिळण्याची शक्यता आहे. या एक्झिट पोल नुसार महायुतीमध्ये समाविष्ट असणाऱ्या भारतीय जनता पक्षाला 77 ते 108 जागा, शिंदे सेना 27 ते 50 जागा आणि अजित पवार गटाला 18 ते 28 जागा मिळू शकतात. तसेच महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असणाऱ्या काँग्रेस पक्षाला 28 ते 47 जागा, ठाकरे सेनेला 16 ते 35 जागा, शरद पवार गटाला 25 ते 39 जागा मिळण्याची शक्यता आहे. इतर ला 12 ते 29 जागा मिळतील असे यामध्ये दाखवण्यात आले आहे.

पीमार्क एक्झिट पोल नुसार, महायुतीला 134 ते 157 जागा मिळण्याची शक्यता आहे तसेच महाविकास आघाडीला 126 ते 146 जागा मिळण्याची शक्यता आहे तसेच इतरांना दोन ते आठ जागा मिळतील असे यामध्ये म्हटले गेले आहे.

झी एआयच्या एक्झिट पोल नुसार, महायुतीला 99 ते 119 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच महाविकास आघाडीला 90 ते 114 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून इतरांना 0 ते 8 जागा मिळू शकतात असे या मध्ये म्हटले गेले आहे.

Chanakya Strategies च्या अंदाजानुसार, महायुतीला 152 ते 160 जागा मिळण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीला 130 ते 138 जागा मिळतील असे यामध्ये म्हटले गेले आहे. तसेच इतरांना तीन ते आठ जागा मिळतील असा अंदाज आहे.

Matrize च्या मतदानोत्तर एक्झिट पोल नुसार महायुतीला 150 ते 170 जागा मिळण्याची शक्यता आहे तर महाविकास आघाडीला 110 ते 130 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच इतरांना आठ ते दहा जागा मिळतील असा अंदाज आहे. महायुती मध्ये समाविष्ट असणाऱ्या भारतीय जनता पक्षाला 89 ते 101 जागा, शिवसेना शिंदे गटाला 37 ते 45 जागा अन अजित पवार गटाला 17 ते 26 जागा मिळणार आणि महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असणाऱ्या काँग्रेसला 39 ते 47 जागा, शरद पवार गटाला 35 ते 43 जागा आणि ठाकरे गटाला 21 ते 29 जागा मिळण्याची शक्यता आहे.

People Pulse च्या मतदानोत्तर एक्झिट पोल नुसार, महायुतीला 175 ते 195 जागा, महाविकास आघाडीला 85 ते 112 जागा आणि इतरांना सात ते बारा जागा मिळतील असा अंदाज आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe