Gold Loan New Rule:- अचानकपणे पैशांची गरज जेव्हा उद्भवते तेव्हा आवश्यक असलेला पैसा स्वतःकडे असतो असे होत नाही व त्यामुळे पैशांची गरज भागवण्यासाठी साहजिकच कर्जाचा पर्याय बऱ्याच जणांकडून अवलंबला जातो. यामध्ये प्रामुख्याने पर्सनल लोन, मालमत्ता तारण कर्ज किंवा गोल्ड लोन म्हणजे सोने तारण कर्जाचा पर्याय अवलंबला जातो व त्या माध्यमातून आर्थिक गरज भागवली जाते.
यामध्ये जर आपण पर्सनल लोन बघितले तर ते असुरक्षित प्रकारातले कर्ज असल्याने त्याचा व्याजदर जास्त असतो व ते प्रामुख्याने पगारदार असलेल्या व्यक्तींना दिले जाते.

परंतु मालमत्ता तारण कर्ज किंवा सोनेतारण कर्ज म्हणजेच गोल्ड लोन हे सुरक्षित प्रकारातील कर्ज असल्याने ते कुठल्याही बँकेच्या माध्यमातून ताबडतोब ग्राहकांना उपलब्ध होते व पर्सनल लोनच्या तुलनेमध्ये त्याचे व्याजदर देखील कमी असतात.
त्यामुळे बरेच व्यक्ती गोल्ड लोन घेण्याचा पर्याय स्वीकारतात. अशा महत्त्वाच्या असलेल्या या गोल्ड लोनच्या बाबतीत आता रिझर्व बँकेच्या माध्यमातून काही बदल करण्यात येण्याची शक्यता असून ते नक्कीच कर्जदात्यांसाठी फायदेशीर ठरणार आहेत.
गोल्ड लोन आता मासिक हप्त्यांमध्ये फेडता येईल?
येत्या काही महिन्यात सोन्याच्या तारणावर घेतलेल्या कर्जाची हप्त्यांमध्ये परतफेड करण्याची सुविधा मिळण्याची शक्यता आहे. सध्या जर आपण कर्ज परतफेडीची पद्धत पाहिली तर यामध्ये व्याजासह एकरकमी परतफेड करावी लागते. यामध्ये रिझर्व बँकेने अलीकडेच बँका आणि नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांना सोन्याच्या दागिन्यावर कर्ज देण्याच्या अनियमितते बद्दल चेतावणी दिली होती.
गोल्ड लोन डिफॉल्ट होण्याच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे रिझर्व बँकेने म्हटले आहे. त्यामुळे आता एनबीएफसी आणि बँका गोल्ड लोनच्या पद्धतीमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत आहेत.
या नवीन संभाव्य बदलांतर्गत बँका आणि नॉन बँकिंग फायनान्स कंपनी अर्थात एनबीएफसी समान मासिक हप्त्यांमध्ये म्हणजेच ईएमआयच्या स्वरूपात गोल्ड लोनची परतफेड करण्याची सुविधा देऊ शकतात.
मिळू शकते आंशिक पेमेंट करण्याची सुविधा
याव्यतिरिक्त गोल्ड लोनमध्ये दुसरा पर्याय म्हणजे आंशिक पेमेंट करण्याचा पर्याय देखील देण्याची शक्यता आहे. या पर्यायाअंतर्गत जेव्हा कर्जदाराकडे पैसा उपलब्ध असेल तेव्हा तो गोल्ड लोनचे काही स्वरूपात म्हणजेच आंशिक पेमेंट करू शकतात. चालू परिस्थिती तशा प्रकारची सोय गोल्ड लोनमध्ये नाही. त्यामुळे हा पर्याय देखील ग्राहकांसाठी फायद्याचा ठरणार आहे.