Maharashtra Election : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर अन गेल्या महिन्यातील महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर आता साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष पालिका निवडणुकांकडे अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
जालना व इचलकरंजी वगळता राज्यातील 27 महापालिका, सर्व नगरपालिका, नगरपंचायती, सर्व जिल्हा परिषदा आणि सर्व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. पण, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लांबणीवर पडल्या आहेत, सध्या तरी या निवडणुका होणार नसल्याचे चित्र आहे.
या निवडणुकांच्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयात येत्या काही दिवसांनी एक महत्त्वाची सुनावणी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 22 जानेवारी 2025 रोजी या निवडणुकांच्या संदर्भात एक सुनावणी होणार आहे आणि यानंतरच निवडणुकीला मुहूर्त लागणार आहे.
सुनावणी पार पडल्यानंतर पालिका निवडणुकांची तयारी करण्यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. यामुळे पुढील वर्षी ज्या निवडणुका अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच होणार अशी शक्यता होती त्या निवडणुका आता लांबणीवर पडणार आहेत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महापालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्य संख्या किती असावी, प्रभाग रचना, सदस्यांची संख्या ही राज्य सरकारने ठरवावी की राज्य निवडणूक आयोगाने याबाबत वाद सुरू असून याच संदर्भात 22 जानेवारीला सुनावणी होणार आहे.
22 जानेवारी रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी होईल आणि त्यानंतर या निवडणुकांची तयारी करण्यासाठी तीन महिने लागणार आहेत. यामुळे सध्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थांची म्हणजेच महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना मुहूर्त लागणार नाही असे दिसते.
जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदारांच्या याद्या तयार करणे, प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी यांसारख्या विविध बाबींचा विचार करता माननीय सर्वोच्च न्यायालयात पार पडणाऱ्या सुनावणीनंतर निवडणुकीच्या तयारीसाठी किमान तीन महिने लागणार आहेत.
त्यानंतर महाराष्ट्रात विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा काळ सुरू होणार आहे. नंतर उन्हाळ्याचा काळ राहील आणि मग पावसाळा लागणार आहे. यामुळे निवडणूका पावसाळ्यात होणार की पावसाळ्यानंतर हे पाहण्यासारखे ठरेल. महत्त्वाचे म्हणजे याबाबतचा सर्व निर्णय राज्य निवडणूक आयोगाकडून घेतला जाणार आहे.
पण त्याआधी स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत होणारी सुनावणी पार पडून निवडणुका घेण्याचा मार्ग सुकर होणे आवश्यक आहे. दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतरचं निवडणुकीची तयारी सुरू होणार असे म्हटले आहे. राज्यातील सुमारे 622 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत.
यामुळे सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांप्रमाणे पुढील वर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची संपूर्ण राज्यभरात रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. एकंदरीत 22 जानेवारी 2025 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयात या निवडणुकांसंदर्भात जी सुनावणी होणार आहे त्या सुनावणीवरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.