Business Planning Tips:- कुठलाही नवीन व्यवसाय तुम्हाला जर सुरू करायचा असेल तर तुम्हाला अनेक बारीक सारीक गोष्टींची खूप काळजी घ्यावी लागते. अगदी परफेक्ट असे नियोजन करणे गरजेचे असते व तरच तो व्यवसाय पुढे चालून चांगल्या पद्धतीने रन होतो व त्या माध्यमातून आपल्याला आर्थिक नफा मिळवता येणे शक्य होते.
व्यवसाय यशस्वी करण्यासाठी त्याच्या स्थापनेपासून तर तुमचे उत्पादन आणि त्याचे मार्केटिंग अशा प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला खूप काळजीपूर्वक नियोजन करणे गरजेचे असते.
अगदी याच पद्धतीने तुम्हाला देखील एखादा नवीन व्यवसाय उभारायचा असेल तर त्या अगोदर तुम्ही काही गोष्टींचा विचार करणे खूप महत्त्वाचे आहे व त्यानंतर व्यवसायाची आखणी व उभारणी करणे गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यामध्ये तुमचा व्यवसाय व्यवस्थित रन होईल व तुम्ही त्या माध्यमातून नुकसान न होऊ देता चांगला पैसा मिळवू शकाल.
नवीन व्यवसाय सुरू करताना या गोष्टींवर लक्ष द्या
1- व्यवसाय निवडताना अगोदर त्याची व्यवहार्यता तपासा- जेव्हा आपण एखाद्या व्यवसायाची निवड करतो आणि तो व्यवसाय सुरू करण्याचे ठरवतो. तेव्हा आपल्याला इच्छा असते की तो व्यवसाय यशस्वी व्हावा. परंतु व्यवसायाची निवड करताना तो व्यवहार्य कल्पनेवर असावा. अव्यवहार्य कल्पनेवर जर आधारित व्यवसाय असेल तर तो यशस्वी होण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात किंवा ते कधी कधी कठीण होऊन बसते.
आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये नवीन कल्पना किती यशस्वी होऊ शकते याचा अंदाज आपल्याला बांधणे अतिशय सोपे आहे.
त्यामुळे तुम्ही ज्या व्यवसायाची निवड करत आहात तो कितपत यशस्वी होऊ शकतो याचा अंदाज बांधण्याकरता तुम्ही या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये तूमच्या व्यवसायातील उत्पादन किंवा सेवेची निर्मिती व मार्केटिंग पर्यंत संपूर्ण माहिती मिळवू शकतात.अशाप्रकारे व्यवस्थित माहिती घेऊनच व्यवसाय निवडावा.
2- व्यवसायातील तुमचा ग्राहक कोण आणि त्याची गरज ओळखा- तुम्ही व्यवसायाची निवड केल्यानंतर त्या व्यवसायातून तुम्हाला तुमचे उत्पादन नेमके कुणाला विकायचे आहे किंवा तुमची सेवा नेमके कोण वापरणार आहात हे शोधून काढणे गरजेचे आहे.
तुमच्या व्यवसायाचे संभाव्य ग्राहकांच्या आवडी आणि नापसंती काय आहेत? याचा तुम्ही शोध घ्यावा. तसेच तुमचे संभाव्य ग्राहक तुम्ही देत असलेले उत्पादन किंवा सेवा शोधण्याची शक्यता कुठे जास्त आहे? अशा प्रकारचे संशोधन करून तुम्ही तुमचे ग्राहकांची यादी किंवा प्रोफाइल तयार करू शकतात.
3- तुमचा युएसपी म्हणजेच युनिक सेलिंग पॉईंट शोधणे- आतापर्यंत तुम्हाला तुमचे उत्पादन किंवा सेवा कोणती आहे व तुमचे ग्राहक कोण आहेत हे समजते. परंतु तुमचे ग्राहक तुमच्याकडून का खरेदी करतील किंवा तुम्हाला का निवडतील याचा देखील अभ्यास करणे खूप गरजेचे आहे यालाच युनिक सेलिंग पॉईंट अर्थात यूएसपी म्हणतात.
मार्केटमधील तुमच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा तुम्ही खूपच कमी किमतीत उत्पादन किंवा सेवा पुरवत आहात का? तसेच ग्राहकाला तुम्ही असा अनुभव देत आहात की त्याला तो कुठेही मिळत नाही? अशा ग्राहकांना आकर्षित करण्याकरिता आणि त्यांना समाधान देण्यासाठी तुमच्या व्यवसायाचा ईएसपी म्हणजे युनिक सेलिंग पॉईंट शोधणे गरजेचे आहे.
4- मार्केटिंग कसे करणार आहात?- आज जर आपण प्रत्यक्ष बघितले तर मोठ्या प्रमाणावर स्पर्धा असल्याचे आपल्याला दिसून येते. आजकाल व्यवसायांकडे मोठ्या प्रमाणावर तरुणाई वळत असल्याने स्पर्धा नक्कीच वाढल्याचे आपल्याला दिसून येते. व्यवसायाच्या अगदी सुरुवातीला खूप कमी पैसे मिळत असतात.
त्यामुळे मिळवलेल्या ज्ञानाच्या जोरावर कमीत कमी खर्चात ग्राहक कसे मिळवायचे हे शोधणे गरजेचे आहे. याकरिता तुम्ही सोशल मीडिया हे एक चांगले माध्यम असून त्याचा वापर करू शकतात व आपले ग्राहक ओळखून आणि त्यांना शोधून टार्गेट करणे सोशल मीडियामुळे शक्य होते.
तसेच तुम्हाला जर तुमचा व्यवसाय ऑनलाइन घेऊन जाता येणे शक्य असेल तर ते खूप उत्तम ठरते. परंतु तुम्ही जर स्थानिक स्वरूपाच्या सेवा देत असाल तर तुमच्या ओळखीच्या लोकांच्या नेटवर्कच्या माध्यमातून जाहिरात तसेच बिझनेस कार्ड छापणे तसेच ते पोस्ट करणे आणि फ्लायर्स लावणे इत्यादी स्थानिक लीड्सला टार्गेट करण्याचा एक चांगला मार्ग तुम्ही अवलंबू शकतात.
5- व्यवसायाच्या भविष्यासाठीच्या योजना- तुम्ही आज व्यवसायला सुरुवात केली. परंतु येणाऱ्या कालावधीत किंवा पुढील काही वर्षांमध्ये तुमचा व्यवसाय कुठे जाणे तुम्हाला अपेक्षित आहे यावर तुम्ही विचार करणे गरजेचे आहे व त्यानुसार अभ्यास करून नियोजन करावे. व्यवसाय दीर्घकालासाठी यशस्वी होण्यासाठी तुम्ही येणाऱ्या दहा ते वीस वर्षाची प्लॅनिंग करून त्यानुसार आतापासून कामाला लागणे खूप गरजेचे असते.