Rohit Pawar On Ram Shinde : काल 19 डिसेंबरला विधान परिषदेच्या सभापती पदासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते प्राध्यापक राम शिंदे यांची निवड करण्यात आली. महायुतीकडून राम शिंदे यांनी 18 तारखेला विधान परिषदेच्या सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महाविकास आघाडी कडून मात्र या पदासाठी कोणालाच संधी देण्यात आली नाही.
यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. राम शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्यावर सध्या सर्वत्र कौतुकांचा वर्षाव आहेत. सभापती महोदयांच्या अभिनंदन प्रस्तावावर देखील वरिष्ठ सभागृहात काल चर्चा झाली अन वरिष्ठ सभागृहातील सर्व सदस्यांनी आणि राज्य शासनातील सर्व मंत्र्यांनी राम शिंदे यांचे स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.
कर्जत जामखेडचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनीही राम शिंदे साहेबांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केल्याचे पाहायला मिळाले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून प्राध्यापक राम शिंदे आणि शरद पवार गटाकडून रोहित पवार यांच्यात लढत झाली होती.
या लढतीत रोहित पवार यांचा अवघ्या काही हजारांनी विजय झाला. पण, राम शिंदे यांची सभापतीपदी निवड होताच रोहित पवारांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. एवढेच नाही तर आमदार रोहित पवार यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट देखील केली आहे.
या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, “विधानपरिषदेचे नवनिर्वाचित सभापती महोदय मा. प्रा. राम शिंदे साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. यावेळी आमदार रोहित आबा पाटील, मा. आ. प्रकाश गजभिये साहेब आणि रविकांत बोपचे हेही उपस्थित होते.
स्व. ना. स. फरांदे साहेबांनंतर विधानपरिषदेचे सभापती या सर्वोच्च पदापर्यंत पोचलेले प्रा. शिंदे साहेब अहिल्यानगर जिल्ह्यातील दुसरे नेते आहेत, ही निश्चितच गौरवाची बाब आहे.” खरंतर गेल्या अडीच वर्षांपासून विधान परिषद सभापतीचे पद रिक्त होते. मात्र आता हे पद भरले गेले आहे.
कर्जत जामखेडचे माजी आमदार प्राध्यापक राम शिंदे यांची विधान परिषद सभापतीपदी बिनविरोध वर्णी लागली आहे. महाविकास आघाडीकडे विधान परिषदेमध्ये अपेक्षित संख्याबळ नसल्याने रामाभाऊंची यावेळी बिनविरोध निवड झाली.
विधानसभा निवडणुकीत पराभव झालेला असतानाही राम शिंदे यांना पक्षाने मोठी जबाबदारी दिलेली आहे. खरे तर रामाभाऊ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सर्वाधिक जवळचे नेते म्हणून ओळखले जातात. फडणवीस यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय नेत्यांच्या यादीत रामाभाऊंचे नाव अगदीच शीर्षस्थानी आहे.
हेच कारण आहे की 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर रामाभाऊंचे विधानपरिषदेवर पुनर्वसन करण्यात आले आणि आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विधान परिषदेचे सभापतीपद रामाभाऊंकडे सोपवण्यात आले आहे.