Maharashtra New Expressway : भारतमाला प्रकल्पांतर्गत महाराष्ट्राला आणखी एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. या प्रकल्पांतर्गत देशभरात हजारो किलोमीटर लांबीचे महामार्गाचे जाळे विकसित करण्यात आले असून अजूनही अनेक महामार्गांची कामे सुरु आहेत. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्प अंतर्गत मुंबई आणि बेंगलोर दरम्यान एक नवा महामार्ग तयार होणार अशी घोषणा केलेली आहे.
त्यामुळे महाराष्ट्राची राजधानी मुंबईहून अवघ्या सहा तासात बेंगलोर गाठता येणार आहे. मुंबई ते बेंगलोर दरम्यानचा प्रवास या नव्या महामार्गामुळे गतिमान होईल आणि महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त होतोय. या नव्याने विकसित होणाऱ्या महामार्ग प्रकल्पामुळे पुणे आणि बेंगलोर या दोन टेक कॅपिटल शहरांमधील अंतर निम्म्याने कमी होणार असा दावा करण्यात आला आहे.
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटल्याप्रमाणे, पुणे ते बेंगलोर दरम्यान 700 किलोमीटर लांबीचा नवा ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे तयार होणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील रस्त्यांची कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होणार आहे. गेल्या दहा-बारा वर्षांच्या काळात राज्यात विविध महामार्ग प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून हजारो किलोमीटर लांबीचे रस्ते महाराष्ट्रात तयार झाली आहेत. यामुळे शहरा शहरांमधील अंतर कमी झाले आहे. मुंबई ते बेंगलोर आणि पुणे ते बेंगलोर दरम्यानचा प्रवास सुपरफास्ट व्हावा यासाठी देखील एक नवा महामार्ग तयार होणार आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्याच्या रिंग रोडपासून एक वळण लागेल आणि तिथून हा हायवे सुरु होणार अशी माहिती समोर आली आहे. आयटी हब असलेल्या पुणे आणि बंगळुरु या दोन शहरांमधील संपर्क वाढवण्याच्या उद्देशाने या महामार्गाची घोषणा करण्यात आली आहे.
या सुपफास्ट हायवेच्या निर्मितीमुळे दोन्ही शहरांमधील अंतर सुमारे 95 किमीने कमी होणार आहे. महत्वाची बाब अशी की, हा महामार्ग मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाला जोडला जाणार आहे.
यामुळे या महामार्गामुळे फक्त पुणे ते बेंगलोर हाच प्रवास वेगवान होणार नाही तर मुंबई ते बेंगलोर हा प्रवास देखील वेगवान होणार आहे. सध्या पुणे ते बेंगलोर हा प्रवास करण्यासाठी 15 ते 16 तासांचा कालावधी लागतो मात्र, जेव्हा हा महामार्ग पूर्ण होईल तेव्हा हा प्रवास कालावधी चार ते 5 तासांवर येणार आहे.
तसेच मुंबई ते बेंगलोर दरम्यानचा प्रवास पूर्ण करण्यासाठी सध्या 18 ते 19 तासांचा वेळ लागतो मात्र जेव्हा हा महामार्ग पूर्ण होईल तेव्हा हा प्रवास अवघ्या सहा ते सात तासांवर येणार आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातील तीन आणि कर्नाटकातील नऊ जिल्ह्यांमधून जाणार आहे. आता आपण या महामार्गाचा संपूर्ण रूट थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा असणार रूट?
पुणे रिंग रोड जवळील कांजळे येथून या महामार्गाची सुरुवात होईल आणि पुढे हा मार्ग सातारा, सांगली जिल्ह्यामधून जाणार आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि सांगली या तीन जिल्ह्यांमधून हा महामार्ग जाईल. कर्नाटकातील बेळगाव, बागलकोट, गदग, कोप्पल, विजयनगर, दावणगेरे, चित्रदुर्ग, तुमकूर आणि बंगलोर ग्रामीण या जिल्ह्यांमधून हा महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे.
हा एक आठ पदरी महामार्ग राहणार असून याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून होणार आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांच्या एकात्मिक विकासाला चालना मिळणार आहे. कृषी उद्योग शिक्षण पर्यटन अध्यात्म या क्षेत्राला या महामार्गाचा सर्वाधिक फायदा होणार आहे. या महामार्गाचा फायदा आयटी क्षेत्राला सर्वाधिक होईल असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे.