Scheme For Women:- गुंतवणुकीच्या बाबतीत सुरक्षितता आणि चांगला परतावा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून पोस्ट ऑफिसच्या अनेक योजना खूप फायदेशीर आहेत. पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक सुरक्षित राहते व त्यासोबत परतावा देखील चांगला मिळतो. त्यामुळे पोस्ट ऑफिसच्या गुंतवणूक योजनांना गुंतवणूकदारांकडून सध्या प्राधान्य दिले जात आहे.
अगदी याच पद्धतीने महिलांसाठी अतिशय फायद्याचे असलेली पोस्ट ऑफिसची एक योजना पाहिली तर ती म्हणजे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना आहे. ही योजना प्रामुख्याने केंद्र सरकारच्या अर्थ विभागाच्या माध्यमातून चालवली जाते.
या योजनेची रचनाच मुळात मुलींकरिता आणि महिलांच्या आर्थिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून करण्यात आलेली आहे. महिलांना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्या पोस्ट ऑफिस आणि बँकांच्या माध्यमातून देखील या योजनेसाठी अर्ज करू शकतात.तरुणी आणि महिलांना गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून ही योजना खूप महत्वपूर्ण आहे.
कसे आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेचे स्वरूप?
गुंतवणुकीच्या दृष्टीने अतिशय सुरक्षित असलेली ही योजना महिलांसाठी अतिशय फायद्याची आहे. या योजनेत जर खाते उघडायचे असेल तर ते 31 मार्च 2025 पूर्वी तुम्हाला उघडता येईल व दोन वर्ष इतका या खात्याचा कालावधी असतो.
या योजनेत ठेवींवर 7.5 टक्के दराने व्याज मिळते व प्रत्येक तिमाहित चक्रवाढ पद्धतीने यामध्ये वाढ केली जाते. दोन वर्ष कालावधीच्या या योजनेमध्ये जर तुम्हाला पैसे काढायचे असतील तर ते तुम्हाला काढता येतात व दोन वर्षे पूर्ण होण्याआधी तुम्ही जमा केलेल्या रकमेतून 40% रक्कम तुम्ही काढू शकतात.
कोणतीही भारतीय महिला आणि मुलींना या योजनेसाठी अर्ज करता येतो. परंतु महत्त्वाचे म्हणजे या योजनेत महिलांना दोन लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत खाती उघडता येतात व या मर्यादेपर्यंत कितीही खाते उघडण्याची मुभा यामध्ये देण्यात आली आहे.
परंतु एक खाते उघडल्यानंतर दुसरे खाते उघडायचे असेल तर दोन्ही खात्यांमध्ये तीन महिन्यांचा कालावधी असणे गरजेचे आहे. या योजनेत महिलांना किमान एक हजार रुपयांपासून तर कमाल दोन लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.
या योजनेत अर्ज कसा कराल आणि लागणारी कागदपत्रे
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला पोस्ट ऑफिस किंवा बँकेमध्ये अर्ज दाखल करावा लागतो. यासाठी लागणारा अर्ज तुम्ही या योजनेच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन डाऊनलोड करू शकतात व त्याच्या प्रिंट सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून स्वयंघोषणापत्र जोडावे लागते व वारसांच्या नोंदी सह अर्ज द्यावा लागतो
व त्यानंतर तुम्हाला जितकी रक्कम गुंतवायची आहे ती गुंतवावी लागते व तुम्हाला त्यानंतर महिला सन्मान बचत प्रमाणपत्र घ्यावे लागते. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी पासपोर्ट साईज फोटो, वयाचा पुरावा तसेच जन्म दाखला, आधार व पॅन कार्ड, पैसे जमा करण्याचा चेक अथवा स्लिप,
पत्त्याचा पुरावा म्हणून पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड, मनरेगा जॉब कार्ड किंवा राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टरचे पत्र ज्यावर नाव आणि पत्ता असेल यापैकी एक कागदपत्रे सादर करावे लागते.
महिलांनी दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर किती परतावा मिळतो?
महिला सन्मान बचत पत्र योजनेमध्ये ज्या महिलांनी दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना त्यावर 7.5% दराने व्याज दिले जाते व ते व्याज दोन वर्षाच्या कालावधीसाठी 32 हजार 44 रुपये मिळते. म्हणजेच दोन लाख रुपये मुद्दल आणि दोन वर्षांनी मिळणारे व्याज असे एकूण 2 लाख 32 हजार 44 रुपये मिळतात.
याशिवाय दीड लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यावर 24 हजार 30 रुपये व्याज मिळते व एक लाख रुपयांची गुंतवणूक केली तर 16022 रुपये इतके दोन वर्षाच्या कालावधीत व्याजाच्या रूपाने मिळतात. तसंच 50000 रुपयांची गुंतवणूक केली तर 8011 इतके व्याज दोन वर्षाच्या कालावधीत मिळते.