शेवगाव : पैशांच्या व्यवहारावरून वरखेड (ता. शेवगाव) येथे मागील महिन्यात झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या चालकाचे नगरमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. भुजंग शामराव मडके (वय ४०) असे मृताचे नाव आहे. त्यांच्यावर सोनेसांगवी (ता. शेवगाव) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेतील दोन आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी मृताची पत्नी योगीता भुजंग मडके (वय ३४) यांनी ३१ डिसेंबर रोजी शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, पती भुजंग हे शनिवारी (ता. २८) शेतात काम करीत असताना महेश दत्तात्रय तेलोरे याने त्यांना दुपारी २.३० वाजता ड्रायव्हरचे पगाराचे पैसे घेण्यासाठी फोन करुन गावामध्ये बोलावून
घेतले. गावातील हनुमान मंदिरासमोर महेश दत्तात्रय तेलोरे, दीपक महादेव तेलोरे, अमोल रावसाहेब उबाळे व इतरांनी लाकडी दांडक्याने त्यांना मारहाण केली. गणेश रावसाहेब वंजारी यांनी हा वाद मिटवून भुजंग यांना घरी आणले. त्यानंतर त्यांना उलट्याचा त्रास झाल्याने शेवगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दुसऱ्या दिवशी प्रकृती खालावल्याने त्यांना अहिल्यानगर येथे उपचारासाठी दाखल केले होते.
उपचारादरम्यान सहाव्या दिवशी (गुरुवार) पहाटे ४ वाजेच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई- वडील, पत्नी, भाऊ, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर वरखेड येथे रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणातील महेश व दीपक तेलोरे या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, अमोल उबाळे व इतर आरोपी फरार झाले आहेत.
पुढील तपास पोलिस निरीक्षक समाधान नागरे हे करीत आहे. पतीला जबर मारहाण केल्यानेच त्यांचा मृत्यू झाला असून, सर्व आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, तसेच फरार आरोपींना त्वरीत अटक करण्याची मागणी योगिता मडके यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.