९ जानेवारी २०२५ मुंबई : शासकीय निवृत्ती वेतन धारकाच्या मृत्यूनंतर त्याचे अपत्य असलेल्या अविवाहित, घटस्फोटीत किंवा विधवा मुलीला, शारीरिकदृष्ट्या पांगळेपण किंवा विकलांगता असलेल्या अपत्यास कुटुंबवेतन देण्याची सुधारणा केंद्र सरकारने निवृत्तीवेतन कायद्यात बुधवारी केली.राज्यानेही तशी सुधारणा केल्याचे वित्त विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२ मध्ये कुटुंब निवृत्ती वेतनाबाबत तरतुदी आहेत. त्यात वेळोवेळी सुधारणा होत असतात.अविवाहित, घटस्फोटीत किंवा विधवा मुलीच्या बाबतीत मुलीला वयाची २४ वर्षे पूर्ण झाली असतील तर हयातभर किंवा तिचा विवाह होईपर्यंत किंवा पुनर्विवाह होईपर्यंत किंवा तिने उपजीविकेची सुरुवात करेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल, तोपर्यंत काही नियमांच्या अधीन राहून निवृत्तीवेतन मंजूर केले जाते.

शासकीय कर्मचारी ज्यावेळी सेवानिवृत्त होतो, त्यावेळी त्याच्या मूळ निवृत्तीवेतन प्रकरणात अन्य पात्र निवृत्तीवेतनधारक, वारसदारासह त्याच्या अविवाहित, घटस्फोटीत किंवा विधवा मुलीचा समावेश करण्याची सुधारणा प्रदान आदेशामध्ये करण्यात आली आहे.कार्यालय प्रमुखाने निवृत्ती वेतनधारकाची नोंद घेताना याचीही नोंद घेणे गरजेचे केले आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या दोन किंवा अधिक अपत्यांपैकी एक अपत्य अज्ञान असेल, तर शेवटचे अज्ञान अपत्य यथाशक्ती २१ किंवा २४ वर्षे होईपर्यंत निवृत्तीवेतन प्रथमतः अज्ञान अपत्यास लागू होईल.त्यानंतर कुटुंब निवृत्तीवेतन मनोविकृत, मानसिक दुर्बल किंवा शारीरिकदृष्ट्या पंगू असलेल्या किंवा विकलांगता आलेल्या अपत्यास प्राधान्याने दिले जाईल.जेव्हा थोरले अपत्य अपात्र होईल, तेव्हा निवृत्ती वेतनधारकाच्या धाकट्या अपत्यास ते मिळेल.













