राष्ट्रवादी प्रवेशाबाबत मला काहीच बोलायचे नाही – एकनाथ खडसे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-भाजप नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार चर्चा असून, ते उद्या घटस्थापनेच्या मुहूर्तावर पक्षांतर करणार असल्याचे बोलले जात आहे.

मात्र, आज दुपारी जळगावात असताना खडसेंनी ‘राष्ट्रवादी प्रवेशाबाबत मला या विषयावर काहीच बोलायचे नाही. नो कमेंट्स’ असे उत्तर देत याविषयाचे खंडन केले. ‘माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतचे सारे मुहूर्त तुमचेच आहेत’, असेही ते यावेळी म्हणाले. शुक्रवारी दुपारी एकनाथ खडसे हे खासगी कामानिमित्त जळगावात आलेले होते.

आपल्या निवासस्थानी असताना ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पत्रकारांनी खडसेंना त्यांच्या संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशाबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, या विषयाबाबत मला कोणतीही चर्चा करायची नाही. मी राष्ट्रवादीत जाणार म्हणून जे मुहूर्त सांगितले जात आहेत,

ते सारे मुहूर्त तुम्हीच म्हणजेच माध्यमांनी ठरवले आहेत, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादी प्रवेशाचे खंडन केले. बोरखेडा येथे घडलेल्या चार अल्पवयीन भावंडांच्या निर्घृण हत्येच्या घटनेसंदर्भात बोलताना खडसे म्हणाले की, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेत 14 वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे समोर येत आहे.

ही बाब अत्यंत घृणास्पद आहे. पोलिसांनी या घटनेचा तातडीने तपास करून आरोपींच्या मुसक्या आवळाव्या, अशी मागणी देखील खडसेंनी केली आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

याबाबत पोलीस प्रशासनाकडे तक्रारी केल्या मात्र काही उपयोग झालेला नाही. जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा कुचकामी ठरली आहे, असा आरोपही खडसेंनी केला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment