Har Ghar Lakhpati Scheme:- स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक असून देशात या बँकेचे कोट्यावधी ग्राहक आहेत. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वाच्या फिक्स डिपॉझिट योजना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून राबवल्या जातात. जेणेकरून बँकेच्या ग्राहकांना गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि खात्रीशीर असा पर्याय निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून या योजना खूप महत्त्वपूर्ण आहेत.
त्याही पुढे जात आता स्टेट बँक ऑफ इंडियाने एक नवीन रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आरडी योजना सुरू केली आहे व या योजनेला हर घर लखपती असे नाव देण्यात आले आहे. या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही प्रत्येक महिन्याला छोटीसी रक्कम तुमच्या खात्यात जमा करू शकता व त्या माध्यमातून चांगला परतावा मिळवू शकतात.
स्टेट बँकेच्या या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकांना 6.75 टक्के वार्षिक व्याजाचा लाभ दिला जाणार आहे आणि त्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांना 7.25% वार्षिक व्याज दिले जात आहे.
या योजनेत कुणाला गुंतवणूक करता येईल?
कोणत्याही भारतीय नागरिकाला या योजनेत गुंतवणूक सुरू करता येऊ शकते. यामध्ये सिंगल किंवा जॉईंट अकाउंट उघडू शकतात. तसेच पालक त्यांच्या मुलासोबत( दहा वर्षापेक्षा जास्त वयाची आणि स्पष्टपणे स्वाक्षरी करण्यास सक्षम असलेल्या) खाते उघडू शकतात.
आवर्ती ठेव म्हणजेच आरडी योजनेतून मिळणारे व्याज उत्पन्न 40 हजार रुपये आणि ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत 50 हजार रुपये असेल तर त्यावर कुठल्याही प्रकारचा टॅक्स देखील भरावा लागणार नाही. मात्र यापेक्षा जर जास्त उत्पन्न असेल तर दहा टक्के टीडीएस कापला जाईल.
समजा तुमच्या आरडी मधूनचे वार्षिक व्याजाच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न 40,000 व ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत 50 हजार रुपयांपर्यंत असेल परंतु तुमचे एकूण वार्षिक उत्पन्न( व्याज उत्पन्नासह) करपात्र असलेल्या मर्यादेपर्यंत नसेल तर टीडीएस कापला जात नाही.
तीन वर्षात एक लाख रुपये जमा करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला किती पैसे जमा करावे लागतील?
सर्वसामान्य नागरिकांना तीन वर्ष कालावधी करीता एक लाख रुपये मिळवण्यासाठी 2500 रुपये तर जेष्ठ नागरिकांना 2400 रुपये दरमहा जमा करावे लागतील. चार वर्ष कालावधीत एक लाख रुपये जमा करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना प्रत्येक महिन्याला १८१० रुपये तर ज्येष्ठ नागरिकांना 1791 रुपये जमा करावे लागतील.
पाच वर्ष कालावधीत एक लाख रुपये जमा करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना 1407 रुपये प्रत्येक महिन्याला तर ज्येष्ठ नागरिकांना 1389 रुपये प्रत्येक महिन्याला जमा करावे लागते.
अशाच प्रकारे जर तुम्हाला दहा वर्षात एक लाख रुपये जमा करायचे असतील तर सर्वसामान्य नागरिकांना प्रत्येक महिन्याला 591 रुपये जमा करावे लागतील तर ज्येष्ठ नागरिकांना 574 रुपये जमा करावे लागतील.
स्टेट बँकेच्या तीन वर्षाच्या आरडीवर सर्वसामान्य नागरिकांना वार्षिक 6.75% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.25 टक्के इतका व्याजदर दिला जातो.