दिल्ली येथे आज देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी भेट घेतली. या भेटीत राधाकृष्ण विखे पाटील यांना पुन्हा राज्य मंत्रिमंडळात स्थान दिल्याबद्दल गृहमंत्र्यांचे आभार मानण्यात आले.
या भेटीच्या वेळी शिर्डी विमानतळाच्या विकासासंदर्भात महत्त्वाचा मुद्दा मांडण्यात आला. सध्या शिर्डी विमानतळावर रात्रीच्या लँडिंगला परवानगी नसल्याचे लक्षात आणून देण्यात आले. सुरक्षा दलाच्या कमतरतेमुळे नाईट लँडिंगमध्ये अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले.
गृहमंत्री अमित शहा यांनी तत्काळ सीआयएसएफचे (CISF) अतिरिक्त सुरक्षा दल उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यामुळे याच महिन्यात शिर्डी विमानतळावर रात्रीच्या उड्डाणांना परवानगी मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले.
या निर्णयामुळे शिर्डी आणि आसपासच्या भागाच्या विकासाला चालना मिळेल तसेच विमान प्रवासासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय टळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.