१० जानेवारी २०२५ हातगाव : शेवगाव तालुक्यात रब्बी हंगामात ज्वारी पिकाला महत्वाचे स्थान दिले जात असे.त्याचे कारण असे सध्या तालुक्यात कपाशी पिकाचा जो पेरा होत आहे, त्यापेक्षाही कितीतरी पटीने या पूर्वी ज्वारी पिकाचा पेरा होत होता; परंतु आता ऊस व कपाशी या दोन नगदी पिकांकडे शेतकरी वळल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून शेवगाव तालुक्यातील ज्वारी पिकाच्या क्षेत्रात घट झाली.
परिणामी धान्य मार्केटमध्ये ज्वारीची अत्यंत कमी प्रमाणात आवक होताना दिसून येत आहे. पूर्वी ज्वारी पिकासोबतच करडी पिकाचेही चांगल्या प्रकारे उत्पादन होत होते.काही शेतकरी ज्वारीच्या पिकात करडीचे पाटे पेरायचे तर काही शेतकरी आपल्या पूर्ण क्षेत्रात करडीची पेरणी करत असे.
मात्र, गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांनी या दोन्हीही पिकांकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे.ज्वारीची काढणी जवळपास २ महिन्यांपेक्षाही जास्त काळ चालत असे.ज्वारी काढणारे मजूर डफड्याच्या तालावर भलरी गाणी म्हणायचे. ज्वारीचे उत्पादन मोठया प्रमाणात होत असल्याने त्याकाळी अनेक शेतकऱ्यांच्या घरी शेतातील पिकलेल्या ज्वारीच्या राशीच्या राशी भरून राहत होत्या.
आशिया खंडात अहिल्यानगर जिल्ह्याची सहकार क्षेत्रात कायम ओळख राहिली असून, साखर कारखानदारीमध्ये राज्यात जिल्हा एक नंबला आजही आहे. सुरुवातीपासून जिल्ह्यात ज्वारी हे मुख्य पीक असताना गेल्या काही वर्षापासून या पिकापासून शेतकरी दुरावला गेला असल्याचे दिसून येत आहे.