अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांना रोजगार उपलब्ध होण्याच्यादृष्टीने अधिकाधिक गरजू व पात्र महिला लाभार्थ्यांना पिंक (गुलाबी) ई-रिक्षाचा लाभ देण्यात यावा. आपला जिल्हा या योजनेमध्ये अग्रेसर राहील यादृष्टीने योजनेची अंमलबजावणी करा, असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पिंक (गुलाबी) ई-रिक्षा योजनेबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नारायण कराळे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे संजय गर्जे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, महिलांना, मुलींना रोजगार निर्मितीस चालना देऊन, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, त्यांना आत्मनिर्भर करणे, तसेच महिला व मुलींना सुरक्षित प्रवास करण्यासाठी ही योजना लाभदायी आहे. पिंक (गुलाबी) ई-रिक्षाचा लाभ घेतल्यानंतर महिलांना स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी इतर कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
शासनाकडून ई-रिक्षांच्या एकूण किंमतीवर सर्व करांसह २० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. ७० टक्के रक्कम कर्ज स्वरूपात बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार असून उर्वरित १० टक्के रक्कम संबंधित महिलेला लाभार्थी हिस्सा म्हणून गुंतवावी लागणार आहे. महिलांनी मोठ्या संख्येने या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री.सालीमठ यांनी यावेळी केले.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नारायण कराळे म्हणाले, योजनेच्या लाभासाठी महिला महाराष्ट्राची मूळ रहिवासी असणे आणि वय २१ वर्ष ते ४० वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. महिलेचे कुटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
पिंक ई-रिक्षा या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये काम करत नसावा. आधार कार्ड, बँक खाते पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो, शाळा सोडलेला दाखला,पॅनकार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड,हमीपत्रासह अर्ज सादर करावा, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.