Ahilyanagar Breaking :पारनेर तालुक्यातील खडकवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात कु. ईश्वरी पांडुरंग रोहकले (इयत्ता तिसरी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रोकडे वस्ती) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. सध्या गावात भीतीचे वातावरण पसरले असून संतप्त ग्रामस्थांनी या नरभक्षक बिबट्याला तातडीने जेरबंद करण्याची मागणी केली आहे.
कु. ईश्वरी ही सदैव हसतमुख, गुणी व हुशार मुलगी होती. रात्री ती राहत्या घरी असताना बिबट्याने अचानक हल्ला केला. या भीषण हल्ल्यात तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी एकत्र येऊन शोधमोहीम हाती घेतली; मात्र तोपर्यंत बिबट्या जंगलाकडे पसार झाला होता.
कु. ईश्वरीच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. वनविभागाने त्वरित उपाययोजना घेऊन ग्रामस्थांना सुरक्षितता प्रदान करावी, अशी स्थानिकांची प्रमुख मागणी आहे.
ग्रामस्थांत भीतीचे वातावरण
खडकवाडीत ग्रामवस्तीवरून शहरातील विविध शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळेला जाणारी मुले व मुली सकाळी व संध्याकाळी रस्त्यावर राहतात; अशा वेळी बिबट्या पुन्हा हल्ला करेल का, याबाबत सर्वजण चिंतेत आहेत.
बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी
या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संतापाचा सुर आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून नरभक्षक बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी केली जात आहे. प्रशासनाने योग्य ती कारवाई केली नाही, तर पुढील तीव्र आंदोलनाचा इशारादेखील स्थानिकांनी दिला आहे.
लोकांनी घ्यायची काळजी
रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडणे शक्यतो टाळावे.
मुलांना वस्तीबाहेर एकटे पाठवू नये; शक्य असल्यास ने-आण करणाऱ्या पालकांनी सोबत राहावे.
बिबट्या किंवा इतर वन्यप्राण्यांची हालचाल दिसल्यास त्वरित वनविभागाला कळवावे.
खासदार निलेश लंके यांची फेसबुक पोस्ट
माझ्या मतदार संघातील जिल्हा परिषद शाळा रोकडे वस्ती खडकवाडी या शाळेची विद्यार्थिनी ईश्वरी पांडुरंग रोहकले इयत्ता चौथी हिचा आज सायंकाळी सुमारे सहा ते साडे सहाच्या आसपास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. असा प्रसंग कुणावरही येऊ नये अशी ही दुर्दैवी घटना आहे. भावपुर्ण श्रद्धांजली म्हणायलाही अवघड वाटतंय.
एक नम्र आवाहन प्रसंग कधी सांगून येत नाही. म्हणून सर्व पालकांना एक विनंती आहे ज्यांची मुले मुली गावाबाहेरील वस्तीवरून प्राथमिक, माध्यमिक शाळेत येतात त्या पालकांनी स्वतः आपल्या मुलांना घरून शाळेपर्यंत सोडवावे आणि शाळा सुटल्यावर शाळेतून घरी घेऊन जावे. आणि वस्तीवर राहतच असाल तर नेहमी सतर्क रहावे.
शक्य असेल तर रानातील वस्तीवर घराभोंवती संरक्षणासाठी पुरेशा उंचीचे तार कुंपण तथा संरक्षक भिंत उभी करावी. आपल्या परिवाराच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती उपाय योजना करावी.काळजी घ्या-स्वतःची, स्वतःच्या परिवाराची, ही घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दिदीला भावपूर्ण श्रद्धांजली. रोहकले कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.