Pune Metro News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! आता पुणे मेट्रोची वेळ वाढवण्यात आली आहे. वनाझ-रामवाडी आणि पिंपरी-स्वारगेट या मेट्रो मार्गांवरील शेवटच्या गाड्या रात्री 10 वाजता सुटत असल्या तरी, प्रवाशांच्या मागणीनुसार ही सेवा आता रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. हा बदल जानेवारी 2025 च्या अखेरीस लागू होणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना उशिराच्या प्रवासासाठी मोठा दिलासा मिळणार आहे.
रात्री उशिराच्या प्रवाशांसाठी दिलासा
मेट्रो सेवा वाढवल्यानंतर, दोन्ही मार्गांवर रात्री 10 नंतर सहा अतिरिक्त फेऱ्या सुरू होतील. या गाड्या 10 मिनिटांच्या अंतराने धावतील. त्यामुळे रात्री उशिरा कामावरून परतणाऱ्या आणि इतर कारणांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना मेट्रोचा अधिक लाभ होईल. पुण्यात मेट्रो सेवा सुरू झाल्यापासून वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मेट्रोमुळे प्रवाशांचा वेळ वाचत असून, शहरातील वाहतूक व्यवस्थेतही सुधारणा झाली आहे.
स्वारगेट ते कात्रज विस्तार लवकरच
स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाच्या विस्तारासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरच कंत्राटदार नियुक्त केला जाईल. याशिवाय, महा मेट्रो मुक्ताई चौक- वाकड- नाशिक फाटा- चाकण या प्रस्तावित नवीन मार्गांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करत आहे. या विस्तारामुळे पुणे मेट्रोचे जाळे अधिक व्यापक होणार आहे.
प्रवाशांसाठी ऑनलाइन सुविधा
प्रवाशांच्या सुविधेसाठी महा मेट्रोने एक ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर प्रवासी त्यांच्या समस्या, सूचना, आणि अभिप्राय शेअर करू शकतात. याशिवाय, प्रत्येक मेट्रो स्टेशनवर QR कोड उपलब्ध करून दिला आहे, ज्याद्वारे प्रवाशांना सेवा अधिक सुलभ होईल.
वाहतूक व्यवस्थेला मिळणार गती
पुणे मेट्रोच्या वेळा वाढल्याने शहरातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होईल आणि उशिरा प्रवास करणाऱ्यांसाठी सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाचा मार्ग उपलब्ध होईल. मेट्रोच्या विस्तार व सुधारणा उपक्रमांमुळे पुणेकरांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.