अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन होणार का ? मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच एका वाक्यात उत्तर…

Ahilyanagar News : नगर जिल्हा विभाजनाचा कोणताही प्रस्ताव राज्य सरकारसमोर सध्या प्रलंबित नाही, अशी स्पष्टता भाजप नेते व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. महसूल मंत्री म्हणून काम पाहत असताना देखील असा प्रस्ताव कधीही समोर आला नव्हता, असे सांगताना त्यांनी जिल्हा विभाजनाच्या अफवा पसरवणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.

शनिवारी नगरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, “हर घर जल” योजनेअंतर्गत नगर जिल्ह्यात केंद्र सरकारच्या निधीतून मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. या कामांमध्ये काही त्रुटी असू शकतात, मात्र त्याचा अर्थ भ्रष्टाचार झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

जलजीवन योजनेतील भ्रष्टाचाराच्या खासदार नीलेश लंके यांच्या आरोपांवर बोलताना त्यांनी टीका केली की, काही लोक केवळ जनतेत टिकण्यासाठी बिनबुडाचे आरोप करत आहेत, आणि त्यांचा कार्यकाळ आता संपत आल्याने जनतेने त्यांना नाकारले आहे.

“स्वामित्व योजना: ग्रामीण विकासासाठी क्रांतिकारी पाऊल”

केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेबाबत बोलताना मंत्री विखे पाटील यांनी ही योजना महात्मा गांधी यांच्या खेड्यांच्या विकासाच्या स्वप्नाला दिशा देणारी असल्याचे सांगितले. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा आर्थिक फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“सुधारित वाळू धोरणावर चर्चा”

राज्य सरकारच्या वाळू धोरणातील सुधारणा अधिक प्रभावी करण्यासाठी नवीन मंत्र्यांशी चर्चा झाल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली. नवीन धोरणातील त्रुटी दूर करून ते अधिक परिणामकारक करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

“जिल्हा बँकेत पारदर्शकता”

जिल्हा बँकेच्या कामकाजाबाबत त्यांनी सांगितले की, बँकेचा कारभार पूर्णपणे पारदर्शक असून राष्ट्रीय पातळीवर तिची कामगिरी उल्लेखनीय आहे. बँकेच्या भरती प्रक्रियाही योग्य पद्धतीने सुरू आहे. बँकेची बदनामी करणाऱ्या लोकांच्या हेतूवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

“महायुतीच्या बॅनरखाली स्थानिक स्वराज्य निवडणुका”

आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत विखे पाटील यांनी महायुती म्हणून निवडणुका लढवणार असल्याचे सांगितले. दिल्लीतील आपचे माजी मुख्यमंत्री यांच्यावर टीका करताना त्यांनी स्पष्ट केले की, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींनी दुसऱ्यांवर आरोप करण्याचे टाळावे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe