Pune News : पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मोठ्या पातळीवर उपाययोजना होत आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) महत्त्वाकांक्षी पुणे रिंग रोड प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन अंतिम टप्प्यात असून कामाला वेगाने सुरुवात होणार आहे.
निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात
रिंग रोड प्रकल्पाची कामे १२ टप्प्यांमध्ये विभागली गेली आहेत. यातील नऊ टप्प्यांसाठी कंत्राटे आधीच मंजूर करण्यात आली असून संबंधित कंत्राटदारांना काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उर्वरित तीन टप्प्यांसाठी सोमवारी आर्थिक निविदा उघडण्यात आल्या, ज्यामध्ये कंत्राट मिळवण्यासाठी स्पर्धा करणाऱ्या कंपन्यांनी आपापल्या बोली सादर केल्या आहेत.
कंत्राट मिळवण्यासाठी ‘या’ कंपन्या शर्यतीत
दोन टप्प्यांसाठी अफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने, तर एका टप्प्यासाठी जीआर इन्फ्राप्रोजेक्ट्सने सर्वांत कमी बोली लावली आहे. त्यामुळे या कंपन्यांना कंत्राट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कंत्राटाची अंतिम घोषणा लवकरच केली जाणार आहे.
रिंग रोड प्रकल्प
वाहतूक कोंडीवर तोडगा काढणारा हा रिंग रोड प्रकल्प पुण्यातील खेड, मुळशी, मावळ आणि हवेली या चार तालुक्यांमधून जाणार आहे. यासाठी ४४ गावांमधील जमिनीचे भूसंपादन सुरू असून रिंग रोड अंदाजे १५ ते २० किलोमीटरच्या परिघात बांधला जाणार आहे. या रस्त्यामुळे बाहेरून येणाऱ्या वाहनांना शहरात प्रवेश करण्याची गरज उरणार नाही. वाहनचालक रिंग रोडचा वापर करून थेट शहराच्या बाहेरून पुढे प्रवास करू शकतील.
वाहतूक कोंडीला अखेरचा रामराम ?
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक समस्या दूर करण्यात हा प्रकल्प क्रांतिकारी ठरणार आहे. रिंग रोड सुरू झाल्यानंतर शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील दबाव कमी होईल, तसेच बाहेरील वाहनांचा शहरावर होणारा ताण पूर्णपणे दूर होईल. हा प्रकल्प पुणेकरांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी ठरत असून वाहतूक व्यवस्थापनात ऐतिहासिक बदल घडवणार आहे.