ॲग्रीस्टॅक नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी विनामूल्य आधार जोडणी करुन घ्यावी – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

Tejas B Shelar
Published:

अहिल्यानगर दि.२२- कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवेचा वापर करुन कृषी योजनांचा शेतकऱ्यांना तातडीने लाभ देण्यासाठी ॲग्रीस्टॅक योजना राज्यात राबविण्यात येत आहे.

या माहितीमधून शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार असल्याने शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी नजिकच्या सीएससी केंद्र, आपले सरकार केंद्र, सेतु केंद्र येथे जाऊन आपली आधार जोडणी विनामूल्य करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे.

शेतकऱ्यांना शेतातील हंगामी पिकांची आणि जमीन नकाशांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने कृषी योजनांसाठी ॲग्रीस्टॅक कार्डसाठी नोंदणी सुरु केली आहे.

अॅग्रीस्टॅकद्वारे शेतकऱ्यांचा डेटा एकत्रित केला जाणार असून त्याआधारे कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवेचा वापर करुन कृषी योजनाचा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

एकत्रित डेटाच्या आधारे विविध शेतीविषयक माहिती मिळाल्याने शासनाला त्वरित निर्णय घेणे सुलभ होणार आहे. तसेच जे लाभार्थी आणि गरजू शेतकरी आहेत, त्यांना वेळेवर मदत मिळण्यासाठी याचा उपयोग होईल.

या प्रकल्पाच्या माध्यमातून नवीन योजना सुरू करण्यासाठी शेतकरी संख्या आणि पिकांची आकडेवारी शासनाला तातडीने उपलब्ध होईल. शेतकरी आणि कृषी योजनांची आखणी करणे, त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी याचा वापर करण्यात येणार आहे.

राज्य, विभाग, जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरीय समितीची निर्मिती करण्यात आली असून प्रत्येक गावामध्ये तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायक हे नोंदणी करणार आहे.

जिल्ह्यात एकूण ३ हजार ३१४ सीएससी सेंटर असून अकोले तालुक्यात १६० सीएससी सेंटर आहेत. जामखेड १७९, कर्जत २३६, कोपरगाव २२९, अहिल्यानगर ३२५, नेवासा ३५४, पारनेर २३६, पाथर्डी २२८, राहाता २०६, राहुरी २०५, संगमनेर ३१४, शेवगाव २६०, श्रीगोंदा १९२ तर श्रीरामपूर तालुक्यात १९० सीएससी सेंटर आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe