Cibil Score:- पर्सनल लोन, होम लोन किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या कर्जासाठी क्रेडिट स्कोर खूप महत्त्वाचा आहे. हे आपल्याला माहित आहे. बँका किंवा नॉन बँकिंग फायनान्स कंपनी म्हणजेच एनबीएफसी कुठल्याही प्रकारचे कर्ज देताना अगोदर तुमचा क्रेडिट स्कोर तपासत असते व त्या आधारावर आपल्याला कर्ज दिले जाते.
क्रेडिट स्कोर अर्थात सिबिल स्कोर जर चांगला असेल तर तुम्हाला गॅरंटीशिवाय कर्ज मिळू शकते व सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे बऱ्याचदा कमीत कमी व्याजदरात देखील तुम्हाला कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
परंतु तुमचा क्रेडिट स्कोर जर चांगला नसेल तर मात्र बँक किंवा नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातून तुमचा कर्जासाठी केलेला अर्ज नामंजूर होऊ शकतो व तुम्हाला कर्ज मिळू शकत नाही.
जरी तुमच्या क्रेडिट स्कोर कमी असेल व तुम्हाला कर्ज दिले गेले तरी त्याचा व्याजदर हा खूप जास्त असण्याची शक्यता असते व अटी देखील खूप कडक असतात.
तुमच्या क्रेडिट स्कोर 500 असेल आणि तुम्ही जर पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या क्रेडिट स्कोरवर कर्ज घेता येऊ शकते का? त्याबद्दलची माहिती बघू.
तुम्हाला 500 सिबिल स्कोर असल्यावर कर्ज मिळू शकेल का?
आपल्याला माहित आहे की, जर आपण अगोदर कर्ज घेतले असेल व त्याचे हप्ते जर वेळेवर भरली गेली नाही तर क्रेडिट स्कोर कमी होतो व तो कधीकधी 500 पर्यंत देखील घसरतो.
अशावेळी मात्र तुम्हाला पुन्हा कर्ज मिळायला खूप समस्या निर्माण होतात व जवळपास कर्ज मिळणे अशक्य होते. जेव्हा तुमचा क्रेडिट स्कोर 500 असतो तेव्हा तुम्ही पूर्वीच्या कर्जाची वेळेवर परतफेड केलेले नाही असा त्याचा अर्थ होतो.
यासोबतच तुम्ही अनेक वेळा कर्जाचे हप्ते डिफॉल्ट केले असेल व त्यावरून तुमची आर्थिक क्षमता कशी आहे किंवा तुम्ही आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत कशा पद्धतीचे आहात? हे दिसून येते व त्यामुळे बँक किंवा एनबीएफसी असे गृहीत धरते की,तुम्ही कर्जाची परतफेड करू शकणार नाहीत. परंतु याचा अर्थ असा होत नाही की, तुम्हाला सिबिल स्कोर 500 असताना ताबडतोब वैयक्तिक कर्ज मिळू शकणार नाही.
कर्ज मिळू शकते परंतु व्याजदर असू शकतो जास्त
तुमचा क्रेडिट स्कोर 500 असेल तरी तुम्हाला कर्जावर अनेक प्रकारच्या ऑफर मिळतात. परंतु या ऑफरवरील व्याजदर मात्र खूप जास्त असतो. तसेच कधी कधी तुम्हाला गॅरेंटरची देखील आवश्यकता देखील भासू शकते.
अशाप्रकारे साध्या सोप्या अटींवर कर्ज मिळण्याची शक्यता खूपच कमी असते. अशा परिस्थितीमध्ये कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या क्रेडिट स्कोर सुधारावा लागेल व त्यासाठी तुमची अगोदरची सर्व थकबाकी वेळेवर भरणे गरजेचे राहील.
क्रेडिट अथवा सिबिल स्कोर म्हणजे नेमके काय?
कर्जावरील व्याजदर प्रामुख्याने तुमच्या क्रेडिट स्कोरवर अवलंबून असतो. आपल्याला माहित आहे की तुम्ही अगोदर घेतलेल्या तुमच्या कर्जाचे पेमेंट कसे मॅनेज केले आहे किंवा प्रीमियम कसे भरले आहात? इत्यादीची माहिती या क्रेडिट स्कोरच्या माध्यमातून मिळते.
क्रेडिट स्कोर 300 ते 900 च्या दरम्यान मोजला जातो. यामध्ये 750 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोर उत्तम मानला जातो व 650 पेक्षा कमी क्रेडिट स्कोर वाईट मानला जातो.
क्रेडिट स्कोर जर चांगला असेल तर त्या माध्यमातून दर्शवले जाते की,तुम्ही तुमचे कर्ज वेळेवर भरले आहे व कमी क्रेडिट स्कोरच्या माध्यमातून दर्शविले जाते की तुम्हाला पेमेंट करण्यास उशीर झाला आहे किंवा कर्ज परतफेड तुम्ही करू शकला नाहीत.