Ahilyanagar News : कोपरगाव तालुक्यातील घारी गावात 20 जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह 25 जानेवारी रोजी गव्हाच्या शेतात सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संगीता वसंत त्रिभुवन (वय 49) या महिलेचा मृतदेह घारी ग्रामपंचायत हद्दीतील रंगनाथ रामजी पवार यांच्या गव्हाच्या शेतात आढळून आला. घटनेने स्थानिक ग्रामस्थ आणि कुटुंबीयांना धक्का दिला आहे.
संगीता त्रिभुवन दुपारी जनावरांसाठी गवत आणण्यासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या, परंतु त्या दिवसापासून त्या घरी परतल्या नाहीत. कुटुंबीयांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.
घटनास्थळावर कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी आणि त्यांच्या टीमसह स्थानिक ग्रामस्थांनी दाखल होत मृतदेह बाहेर काढला. शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
मृत्यूच्या कारणावर संशय
संगीता त्रिभुवन यांच्या मृत्यूमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक स्वरूपात हा घातपात आहे की विषारी प्राण्याचा दंश झाला आहे, याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. पोलीस तपासणी आणि शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच या घटनेचा उलगडा होणार आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि तिच्या कुटुंबीयांनी या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले असून या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलीस तपास सुरू
पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळाची सखोल तपासणी सुरू केली आहे. मृतदेहाच्या परिस्थितीवरून कोणताही घातपात झाल्याचा संशय असल्यास त्याचाही तपास केला जाईल. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
कुटुंबावर दु:खाचा डोंगर
संगीता त्रिभुवन यांच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे. त्यांचे कुटुंबीय हे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे असून, त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासन यांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली आहे.