लाेखंड लुटण्यासाठी अहिल्यानगरच्या व्यावसायिकाची हत्या ! प्रेयसीला कॉल केला आणि झाला घात…

Ahilyanagar News : ट्रक मालक विजय मुरलीधर राऊत (५२, रा. केडगाव, अहिल्यानगर) यांची हत्या लुटमारीच्या उद्देशाने करण्यात आली असल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. राऊत यांना ओळखणाऱ्या गणेश वसंत पवार (बदली चालक, रा. सुलतानपूर) याने मित्र गणेश गजानन कुटे आणि ज्ञानेश्वर गणेश घायाळ यांच्या मदतीने हा गुन्हा केला. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा उलगडा करत अवघ्या २४ तासांत तिघांना अटक केली.

अहिल्यानगर मध्ये राहणारे राऊत रायपूरला माल पोहोचवून अडीच हजार किलो लोखंड घेऊन परत निघाले होते. बुधवारी पहाटे त्यांचा मृतदेह सोलापूर-धुळे महामार्गावरील आडगाव येथे ट्रकच्या टूलबॉक्समध्ये आढळून आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी जाऊन तपासाला सुरुवात केली.

लुटमारीचा कट:

गणेश पवार, जो कर्जबाजारी होता आणि नशेच्या आहारी गेला होता, त्याने रायपूरमध्ये राऊत यांच्याकडून लोखंडाच्या मालाची माहिती मिळाली. पैशाच्या गरजेमुळे त्याने लुटमारीचा कट रचला.

हत्या कशी झाली ?

सोमवारी सकाळी पवारने राऊत यांना मेहकरपर्यंत सोडण्याची विनंती केली. वाटेत नाष्ट्यानंतर राऊत यांना आराम करण्यास सांगून पवारने गाडी चालवायला घेतली. राऊत झोपेत असताना पवारने टॉमीने त्यांचे डोके ठेचून हत्या केली. मेहकरपासून घायाळ आणि कुटे या साथीदारांनी त्याला साथ दिली. त्यांनी ३०,००० रुपयांना काही लोखंड विकले, पण उर्वरित माल विक्रीसाठी ग्राहक मिळाला नाही. ट्रकमध्ये मृतदेहामुळे दुर्गंधी पसरत असल्याने आरोपींनी रूम फ्रेशनर देखील मारले. अखेर जालन्यात ट्रक सोडून आरोपी पसार झाले.

प्रेयसीला कॉल केला आणि …

हत्या केल्यानंतर पवारचा फोन बंद पडला. प्रेयसीशी संपर्क साधण्यासाठी त्याने तब्बल ११ वेळा कॉल केले. या कॉल्सच्या तपशिलावरून पोलिसांनी महिलेपर्यंत पोहोचत तपासाची दिशा बदलली. टोलनाक्याच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पवार स्पष्टपणे दिसल्याने त्याला पकडण्यात आले.

गुन्हेगारांना अटक

पोलिसांनी गणेश पवार, गणेश कुटे, आणि ज्ञानेश्वर घायाळ या तिघांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.ही घटना फक्त आर्थिक अडचणीमुळे गुन्हा घडण्याचे उदाहरण ठरते. पोलिसांच्या जलद कारवाईमुळे गुन्ह्याचा उलगडा झाला, पण ही घटना समाजाला गुन्हेगारीकडे वळवणाऱ्या परिस्थितीचा विचार करायला लावते.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe