Ahilyanagar News : संपूर्ण राज्याच्या कुस्तीप्रेमींच्या नजरा लागलेल्या 67 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा भव्य शुभारंभ आजपासून अहिल्यानगरच्या वाडिया पार्क मैदानात झाला आहे. कै. बलभीमअण्णा जगताप क्रीडानगरीत रंगणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी राज्यभरातील 42 संघांचे 860 नामवंत मल्ल सहभागी झाले आहेत. यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा विशेष चर्चेत आहे, ती प्रचंड आकर्षक बक्षिसांमुळे !
पहिल्या तीन मल्लांना बक्षिसे
आत्तापर्यंतच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धांमध्ये फक्त विजेता आणि उपविजेत्यांनाच बक्षिसे मिळायची, मात्र यंदा तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्यासह प्रत्येक वजनी गटातील पहिल्या तीन मल्लांना देखील खास बक्षिसे दिली जाणार आहेत. यामध्ये थार, बोलेरो, बुलेट, स्प्लेंडर आणि सोन्याच्या अंगठ्यांचा समावेश आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात बक्षिसे देणारी ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा पहिलीच आहे, असे आयोजक आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले आहे.
बक्षिसांची ऐतिहासिक यादी
आमदार संग्राम जगताप यांनी स्पर्धेतील बक्षिसांचे तपशील जाहीर करताना सांगितले की, महाराष्ट्र केसरी किताब जिंकणाऱ्या मल्लाला चांदीची गदा आणि ‘थार’ ही आलिशान गाडी दिली जाणार आहे. उपविजेत्याला ‘बोलेरो’ कार, तर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या मल्लाला देखील खास सन्मानजनक बक्षीस मिळणार आहे.
माती आणि गादी विभागातील प्रत्येक वजनी गटातील बक्षिसे:
विजेता : बुलेट मोटरसायकल
उपविजेता : स्प्लेंडर मोटरसायकल
तृतीय क्रमांक : अर्धा तोळा सोन्याची अंगठी
यासाठी थार, बोलेरो, 18 बुलेट, 20 स्प्लेंडर आणि 30 सोन्याच्या अंगठ्या तयार ठेवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे ही बक्षिसे आमदार संग्राम जगताप यांनी स्वखर्चातून दिली आहेत. त्यासोबत काही दानशूर उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी देखील योगदान दिले आहे.
कुस्तीप्रेमींसाठी खास व्यवस्था
अहिल्यानगर महापालिकेने या स्पर्धेसाठी 25 लाख रुपयांचा निधी दिला आहे. यातून गादी आणि माती विभागासाठी प्रत्येकी दोन आखाडे तयार करण्यात आले आहेत. याशिवाय, 25,000 प्रेक्षक बसू शकतील अशी भव्य सोय, तसेच राज्यभरातून आलेल्या 860 मल्लांसाठी उत्तम राहण्याची आणि खुराकाची व्यवस्था करण्यात आली आहे.
भविष्यात ऑलिंपिकमध्ये पदके जिंकावीत…
स्पर्धेचे यजमानपद मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना आमदार संग्राम जगताप म्हणाले, “ही स्पर्धा केवळ प्रतिष्ठेची नाही, तर जिल्ह्यातील कुस्तीगीरांना नवसंजीवनी देणारी आहे. महाराष्ट्र केसरी किताब जिंकण्याच्या पलीकडे जाऊन, मल्लांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी आणि भविष्यात ऑलिंपिकमध्ये भारतीय मल्ल पदके जिंकावीत, हाच आमचा उद्देश आहे.”
स्पर्धेत डोपिंग टेस्ट अनिवार्य
या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच महाराष्ट्र केसरी आणि राज्य अजिंक्यपद स्पर्धेत मल्लांसाठी डोपिंग टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या स्पर्धांमध्ये डोपिंग टेस्ट घेण्याची सक्ती नव्हती, मात्र केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रयत्नातून ‘NADA’ संस्थेच्या माध्यमातून ही चाचणी होणार आहे. त्यामुळे स्पर्धेतील मल्लांनी कोणतेही निषिद्ध पदार्थ घेतले नाहीत, याची खातरजमा केली जाणार आहे.
स्पर्धेतील प्रमुख आकर्षण
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत माती आणि गादी या दोन्ही प्रकारांमध्ये कुस्त्यांचे सामने होतील. प्रत्येक विभागातील अंतिम विजेता निश्चित केल्यानंतर गादीवर अंतिम सामना खेळला जाईल आणि अंतिम विजेत्याला ‘महाराष्ट्र केसरी’ किताब प्रदान केला जाईल.
स्पर्धेसाठी 36 जिल्हे आणि 6 महापालिकांचे एकूण 42 संघ सहभागी होत आहेत. यामध्ये 860 मल्ल एकूण 900 कुस्त्यांमध्ये सहभाग घेणार आहेत. स्पर्धेच्या योग्य नियोजनासाठी 125 पंच आणि 80 पदाधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
ऐतिहासिक कुस्ती महोत्सवाचा थरार
या भव्य स्पर्धेसाठी अहिल्यानगर क्रीडानगरीत राजवाड्याच्या प्रतिकृतीसारखे प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. आतमध्ये 100 बाय 45 फुटांचा किल्ल्याच्या बुरुजासारखा मंच तयार करण्यात आला असून, त्यावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजामाता यांची प्रतिमा उभारण्यात आली आहे.
पोलिस प्रशासनाची विशेष सुरक्षा व्यवस्था
मुख्य व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पोस्टर लावण्यात आले आहेत. स्पर्धेच्या सुरळीत आयोजनासाठी पोलिस प्रशासनाची विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, स्पर्धा मैदानाची पाहणीही करण्यात आली आहे.
महाराष्ट्र केसरीचा थरार अनुभवण्याची संधी!
29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान कुस्ती चाहत्यांना राज्यभरातील सर्वोत्तम मल्लांमधील थरारक सामने पाहायला मिळणार आहेत. अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संग्राम जगताप, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे पोस्टर संपूर्ण मैदानात लावण्यात आले असून, यंदाची स्पर्धा केवळ स्पर्धकांसाठी नव्हे तर कुस्तीप्रेमींसाठीही ऐतिहासिक ठरणार आहे.
ही स्पर्धा केवळ मल्लांच्या कौशल्याची चाचणी घेणारी नाही, तर महाराष्ट्रातील कुस्ती संस्कृतीला पुढे नेण्याचा एक मोठा प्रयत्न आहे. कुस्तीप्रेमींनी या थरारक लढतींचा आनंद घ्यावा आणि आपल्या आवडत्या मल्लांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.