अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- आपल्या हटके स्टाईलमध्ये कीर्तनाद्वारे प्रबोधन करणारे इंदुरीकर महाराज हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. राजकीय चर्चा असो व इतर विषय महाराजांच्या कृती या सध्या चर्चेचा विषय बनत आहे.
नुकतेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापलेले आहे. या अनुषंगाने मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाज बांधवांकडून मोर्चाचे आयोजन केले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर (देशमुख) महाराज शनिवारी अकोले येथे निघालेल्या मराठा क्रांती मोर्चात सहभागी झाले होते.
त्यातच गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक पोस्ट इंदुरीकरांच्या नावाने आणि फोटोसह असल्याने लक्षवेधक ठरली होती. ‘मी येतोय, तुम्हीही या’ असे आवाहन ते सोशल मीडियातून करत होते.
इंदुरीकरांनी मोर्चासंबंधी आवाहन केले होते की, ‘सर्व राजकीय पक्ष, कार्यकर्ते, सर्व समाजातील नेते, विविध संस्थांचे आजी -माजी पदाधिकारी, बंधू व भगिनींना जाहीर आवाहन करतो की,
हा मोर्चा कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात नसून मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आहे. आजपर्यंत मराठा समाजाने सर्व जाती धर्माचा मोठ्या भावा प्रमाणे आदर केला आहे.
त्यामुळे सर्व समाजातील नागरिकांनी पाठींबा देण्यासाठी या मोर्चासाठी यावे.’ त्यानुसार शनिवारी मोर्चा झाला. मात्र, मोर्चानंतरच्या सभेत ते स्टेजवर न बसता खाली आंदोलकांच्या गर्दीत बसले.
त्यांना स्टेजवर बोलविण्यात आले, तरीही ते गेले नाहीत. राजकारण्यांची भाषणे लांबत गेली आणि सभा लांबत असल्याचे पाहून इंदुरीकर महाराज भाषण न करताच निघून गेले. नेहमीप्रमाणे अन्य राजकारण्यांनीच सभा ‘गाजविली’.
यावेळी झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर होते. माजी मंत्री मधुकर पिचड, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष भानुदास तिकांडे, मधुकर नवले,
शिवाजी धुमाळ, अशोक भांगरे, भाजपचे तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे, काँग्रेसचे बाळासाहेब नाईकवाडी, शिवसेनेचे महेश नवले, मच्छिंद्र धुमाळ आदींची भाषणे झाली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved