Ahilyanagar News : शुक्रवारी राज्याचे अन्न सुरक्षा मंत्री धनंजय मुंडे हे भगवान गडावर मुक्कामी थांबले होते. यावेळी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून मुंडे यांच्यावर विनाकारण टीका केली जात असल्याचे सांगत.
काही वादग्रस्त वक्तव्य केले होते. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद कर्जत येथे उमटलेले दिसून आले. कर्जत येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शनिवारी (दि.१) फेब्रुवारी रोजी येथील सकल मराठा समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत महंत नामदेव शास्त्री यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा तीव्र निषेध करण्यात आला.

या वेळी सकल मराठा समाजाच्या वतीने कर्जतच्या पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन देवून यासंदर्भात कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना जे बेताल वक्तव्य केले. ते वक्तव्य जातीयवादी असून, त्यांनी केलेल्या वक्तव्याने सकल मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.
त्यांच्या बोलण्यामुळे जातीयवाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळे आमच्या भावना तीव्र झाल्या असून, अशा वाचाळवीरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. सकल मराठा समाजाचे प्रमुख समन्वयक रावसाहेब धांडे म्हणाले,
बेताल वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. या वेळी सकल मराठा समाजाचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.