Story Of Makardhwaj:- हनुमानजी भगवान श्रीरामांचे निस्सीम भक्त आणि सर्वांत पराक्रमी योद्धा मानले जातात. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य श्रीरामांच्या सेवेत घालवले आणि प्रत्येक संकटात त्यांच्या रक्षणासाठी तत्पर राहिले. विशेष म्हणजे हनुमानजींनी बालपणापासूनच ब्रह्मचर्य व्रत स्वीकारले होते. मात्र अनेकांना आश्चर्य वाटेल की,जर हनुमानजी ब्रह्मचारी होते तर त्यांचा पुत्र कसा जन्माला आला? याचे उत्तर पौराणिक ग्रंथ आणि रामायणात मिळते. ज्यामध्ये मकरध्वजाच्या जन्माची कथा सांगितली आहे.
मकरध्वजाच्या जन्माची कथा
![hanumanji](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/zhh.jpg)
रामायणातील कथेप्रमाणे, लंका युद्धादरम्यान हनुमानजींनी लंकेला आग लावली आणि सीतेचा शोध घेतल्यानंतर समुद्रावर परतले. त्यांच्या शेपटीला लागलेली आग विझवण्यासाठी त्यांनी समुद्रात उडी मारली.
त्या वेळी त्यांच्या शरीराचे तापमान खूपच जास्त होते व त्यामुळे त्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या व या घामाचा एक थेंब समुद्रात पडला. योगायोग असा की, त्या समुद्रात एक महाकाय मासा पोहत होता आणि त्याने हा थेंब गिळला.
या घटनेनंतर काही काळाने माशाच्या गर्भात हनुमानजींच्या घामातून निर्माण झालेल्या बालकाचा विकास झाला. हा मासा नंतर पाताळ लोकात पकडला गेला आणि जेव्हा तो कापण्यात आला तेव्हा त्याच्या पोटातून मकरध्वज नावाचा बलशाली मुलगा बाहेर आला. मकरध्वज हा वानरसारखा दिसत होता. पण त्याचा जन्म एका माशाच्या गर्भातून झाला होता, त्यामुळे त्याचे नाव “मकरध्वज” ठेवले गेले.
मकरध्वजाचा पालनपोषण आणि अहिरावणाची भेट
पाताळ लोकाचा राजा अहिरावण हा रावणाचा एक शक्तिशाली सहकारी होता. त्याच्या सेवकांनी मोठा मासा पकडला आणि त्याला स्वयंपाकासाठी नेले. मासा कापल्यानंतर जेव्हा मकरध्वज बाहेर आला तेव्हा सगळे आश्चर्यचकित झाले.
अहिरावणाने त्याला आपल्यासोबत ठेवले आणि त्याला आपला पुत्र मानले. मोठा झाल्यावर त्याला पाताळपुरीचा द्वारपाल बनवण्यात आले आणि त्याला पाताळाचे रक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली.
राम आणि लक्ष्मणांचे अपहरण आणि हनुमानजींची पाताळात एंट्री
लंकेतील युद्धादरम्यान, रावणाला मदत करण्यासाठी अहिरावणाने एक योजना आखली. त्याने आपल्या मायावी शक्तीच्या मदतीने राम आणि लक्ष्मण यांना चकवा दिला आणि त्यांचे अपहरण करून त्यांना पाताळात नेले. वानर सेना आणि विभीषण यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी हनुमानजींना पाताळात जाण्यास सांगितले.
हनुमानजींनी पाताळपुरीत पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की,त्या ठिकाणी सात दरवाजे होते आणि प्रत्येक दरवाज्यावर एक बलवान पहारेकरी तैनात होता. हनुमानजींनी आपल्या अद्वितीय शक्तीने एकामागून एक सगळ्या पहारेकऱ्यांना हरवले. मात्र शेवटच्या दरवाज्यावर एक बलवान वानरसदृश योद्धा उभा होता. जो हनुमानजींना आत जाऊ देण्यास नकार देत होता.
हनुमान विरुद्ध मकरध्वज सामना
हनुमानजींनी त्या योद्ध्याला विचारले, “तू कोण आहेस आणि मला आत का जाऊ देत नाहीस?”
त्यावर तो उत्तरला, “मी मकरध्वज आहे, शक्तिशाली पवनपुत्र हनुमानाचा पुत्र!”हे ऐकताच हनुमानजींना धक्का बसला. “मी जन्मतःच ब्रह्मचारी आहे, मग तू माझा पुत्र कसा?” असा प्रश्न त्यांनी मकरध्वजाला विचारला.तेव्हा मकरध्वजाने त्याच्या जन्माची संपूर्ण कथा सांगितली. हनुमानजींना सत्य समजले आणि त्यांनी मकरध्वजाला पुत्र म्हणून स्वीकारले.
मात्र मकरध्वजाने आपले कर्तव्य सोडण्यास नकार दिला. अहिरावणाच्या आज्ञेनुसार कोणालाही पाताळात प्रवेश मिळू शकत नव्हता. त्याने हनुमानजींना सांगितले, “जर तुम्हाला आत जायचे असेल तर मला हरवावे लागेल!” यानंतर पिता आणि पुत्रामध्ये भयंकर युद्ध सुरू झाले. दोघेही शक्तिशाली असल्याने ही लढाई खूप काळ चालली. शेवटी हनुमानजींनी आपल्या शेपटीने मकरध्वजाला घट्ट बांधले आणि त्याला पराभूत केले. त्यानंतर ते आत प्रवेश करू शकले.
हनुमानजींनी अहिरावणाचा वध करून राम-लक्ष्मणाला सोडवले
पाताळात पोहोचताच हनुमानजींनी अहिरावणाचा शोध घेतला आणि त्याच्याशी भयंकर युद्ध केले. शेवटी अहिरावणाला ठार मारून हनुमानजींनी राम आणि लक्ष्मण यांची सुटका केली. त्यांनी दोघांनाही आपल्या खांद्यावर घेऊन पाताळपुरी सोडली.जेव्हा श्रीरामांनी मकरध्वजाला पाहिले आणि त्याच्या जन्माची कथा ऐकली तेव्हा त्यांनी त्याच्या निष्ठेची प्रशंसा केली. हनुमानजींनी आपल्या पुत्राची ओळख श्रीरामांना करून दिली. यावर श्रीरामांनी मकरध्वजाला आशीर्वाद दिला आणि त्याला पाताळपुरीचा नवा शासक घोषित केले.
भक्ती आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श
हनुमान आणि मकरध्वज यांची कथा भक्ती, निष्ठा आणि कर्तव्यनिष्ठेचा उत्तम आदर्श आहे. मकरध्वज हा एकमेव योद्धा होता. ज्याने हनुमानजींना लढाईसाठी आव्हान दिले आणि आपल्या समान शक्ती दाखवली.
आजही गुजरातमधील बेट द्वारका येथे मकरध्वजाचे मंदिर आहे. जिथे भक्त हनुमान आणि त्यांच्या पुत्राची पूजा करतात. हनुमानजींनी आपले जीवन श्रीरामांच्या सेवेत वाहिले. पण त्यांचे वंशज मकरध्वज देखील एक महान योद्धा म्हणून ओळखले जातात.ही कथा आपल्या सर्वांना शिकवते की कर्तव्य आणि भक्ती यापेक्षा मोठे काहीच नाही