High Court News : मृत व्यक्तीच्या संपत्तीवर नॉमिनीला कोणताही हक्क नाही, जर तो अधिकृत वारसदार नसेल. वारसदारच संपत्तीचे खरे हक्कदार असतात आणि ती संपत्ती त्यांच्या मध्ये समान प्रमाणात वाटली गेली पाहिजे, असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निकाल दिला.
काय आहे प्रकरण ?
नागपूरचे दिवंगत गोपालकृष्ण शिवहरे यांच्या दोन मुली शैल आणि संतोष, तसेच दोन मुले लक्ष्मीकांत आणि श्रीराम होते. शैल यांनी लक्ष्मीकांत यांच्या मुलगा अभिषेकला दत्तक घेतले होते आणि त्यांनी त्यांच्या बँक खात्यांमध्ये अभिषेकला नॉमिनी म्हणून नियुक्त केले होते.

शैल यांच्या मृत्यूनंतर (6 मे 2013) अभिषेकने त्यांच्या बँक खात्यातील 90,150 रुपये काढले आणि उर्वरित रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्रीराम आणि संतोष यांनी याला आक्षेप घेतला आणि न्यायालयात दाद मागितली.
हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निकाल देताना स्पष्ट केले की, नॉमिनी हा केवळ खातेधारकाच्या मृत्यूनंतर बँकेतील रक्कम काढण्यासाठी अधिकृत असतो, परंतु त्याला त्या रकमेचा मालकी हक्क प्राप्त होत नाही. बँकेतील रक्कम ही वारसाहक्कानुसारच वितरित केली गेली पाहिजे. त्यामुळे, अभिषेकने काढलेली रक्कम आणि उर्वरित रक्कम वारसदारांमध्ये समान प्रमाणात वाटप करण्याचा आदेश हायकोर्टाने दिला.
पूर्वीचे न्यायालयीन निर्णय
या प्रकरणात, श्रीराम आणि संतोष यांनी सुरुवातीला वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या न्यायालयाने तीन वारसदारांना फक्त 60,993 रुपयांचा वाटा दिला होता. मात्र, हा निर्णय अमान्य मानून त्यांनी जिल्हा न्यायालयात अपील केले. जिल्हा न्यायालयाने पूर्वीच्या निर्णयात बदल करून, तीन वारसदारांना एकूण 15 लाख 12 हजार 156 रुपये वाटप करण्याचा निर्णय दिला.