२२ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा त्याचबरोबर राहुरी पोलिस स्टेशन आणि आता अहिल्यानगर शहरातील महत्वाचे समजले जाणारे कोतवाली पोलिस ठाणेही ॲक्शन मोडवर आहे. कोतवाली पोलिसांच्या अवैध व्यावसायिकांविरुद्ध जोरदार कारवाया सुरु आहेत.अशाच एका कारवाईसाठी कोतवाली पोलिस स्टेशनचे पथक रवाना झाले होते. ते पकडायला गेले होते दोन गावठी कट्टेवाला मात्र हाती सापडले त्यांना गॅस लाईटर.
या प्रकरणातील दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. त्यातील एक जण खुनाच्या प्रयत्नातील आरोपी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांना २१ फेब्रुवारी रोजी दिल्लीगेट परिसरात असलेल्या दोघांकडे गावठी कट्टा असल्याची माहिती प्राप्त झाली.

त्यानुसार त्यांनी तातडीने कोतवाली पोलिस ठाण्याचे पो.नि. प्रताप दराडे यांना, आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले.पोलिस पथकाने प्रफुल्ल अनिल मिरपगार (वय १९) आणि शिमोन जनार्दन मिरपगार (वय १८, दोघे रा. मिरी, ता.पाथर्डी, हल्ली रा.दिल्लीगेट) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्यातील शिमोन मिरपगार याच्या ताब्यात एक गावठी कट्टा सदृश्य गॅस लाइटर मिळून आले.
ताब्यात घेतलेल्या दोघांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता प्रफुल्ल मिरपगार याच्या विरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जाधव यांच्याशी संपर्क साधून आरोपी प्रफुल्ल मीरपगार यास पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, उपनिरीक्षक कैलास कपीले, पोलीस हवालदार योगेश भिंगारदिवे, विशाल दळवी, संदीप पितळे, सलीम शेख, दीपक रोहकले, तानाजी पवार, अभय कदम, अतुल काजळे, सुरज कदम, सचिन लोळगे, अमोल गाडे, संकेत धीवर, राम हंडाळ, विजय गावडे यांनी केली आहे.