२२ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : नगर अर्बन बँकेतील कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी १०५ आरोपींची नावे निष्पन्न झाली असून,आता पर्यंत सुमारे १५ ते २० आरोपींना अटक झालेली आहे.उर्वरित आजही उजळ माथ्याने फिरत आहेत.पोलिसांचा तपास धिम्या गतीने सुरू असून,या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून आरोपींवर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी बँकेचे सभासद राजेंद्र चोपडा यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच अर्बन बँकेच्या पिडित ठेवीदारांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन सखोल कारवाई बाबत आदेश दिले. तरीही आरोपी मोकाट आहेत. संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात अतिशय कणखर भूमिका घेत कारवाई सुरू केली. दुर्दैवाने नगरमधील या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी गृहखाते गंभीर दिसत नाही.

नगर अर्बन बँकेत तत्कालीन चेअरमन दिवंगत माजी खासदार दिलीप गांधी व इतर संचालक मंडळाने तब्बल २९१ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टमध्ये ही बाब निष्पन्न झाली आहे. परंतु फक्त १५ ते २० आरोपींना अटक झाली आहे.उर्वरित आरोपी मोकाट फिरत आहेत.आरोपींच्या मालमत्ता जप्तीची कारवाई अद्याप सुरू झालेली नाही.बँकेची कर्ज थकबाकी वसुलीसुद्धा ठप्प आहे. परिणामी हजारो ठेवीदार त्यांच्या हक्काच्या पैशांपासून वंचित आहेत.
पालकमंत्री विखे पाटील यांनी ठेवीदार, जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, बँकेचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन आदेश पारित केले. त्यानुसार आतापर्यंत काय कारवाई झाली याची कोणतीही माहिती ठेवीदार तसेच बँक बचाव कृती समितीला दिली जात नाही. आताच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आरोपीना अटक करणे शक्य आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा पोलिस तपासात आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी आग्रही असतात. तरी सुद्धा नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेला तसेच तपास यंत्रणेला या मोठ्या आर्थिक घोटाळ्यातील आरोपींचा शोध लागत नसेल तर हे खूप मोठं दुर्दैव आहे.
अवसायकांनी कठोर भूमिका घ्यावी
आरोपींची मालमत्ता जप्तीची प्रक्रियाही जलदगतीने होणे आवश्यक आहे.आमच्यासारखे बँकेचे हितचिंतक यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. बँकेच्या अवसायकांनीही कठोर भूमिका घेतली पाहिजे. कारण नगर अर्बन बँकेतील घोटाळ्यामुळे सर्वसामान्यांचा सहकारी बँकिंग, सहकारी पतसंस्थांवरील विश्वास कमी होताना दिसत आहे.