राज्य परिवहन महामंडळाच्या जिल्ह्यातील विविध आगारांकडे असलेल्या बसेसची संख्या कमी असून अनेक बसेस जुन्या झाल्याने मार्गामध्ये बंद पडण्याचे प्रमाण मोठया प्रमाणावर वाढले आहे. प्रवाशांची वाढती संख्या पाहता नगर जिल्ह्यातील सर्व आगारांना नव्या बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी खा. नीलेश लंके यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे.
मंत्री सरनाईक यांना पाठविलेल्या निवेदनात खासदार नीलेश लंके यांनी नमुद केले आहे की, राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांना विविध सवलती जाहीर केल्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवासी संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

वाढत्या प्रवासी संख्येच्या तुलनेत जिल्ह्यात सध्या सर्व आगारांच्या मिळून सुमारे ६०० बसेस आहेत. गेल्या तीन वर्षामध्ये बसेसची संख्या खूप कमी झालेली आहे. तसेच बसेस जुन्या असल्यामुळे मार्गामध्ये बंद पडतात. काही बसेस स्क्रॅप करण्यात आलेल्या असल्याचे खा. लंके यांनी नमूद केले आहे.
सर्व आगारांना जास्तीत जास्त बसेस मिळाव्यात
राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील इतर जिल्ह्यातील काही आगारांना बसेस दिल्याची माहीती आहे. परंतू अहिल्यानगर जिल्ह्यातील तारकपुर आगाराला १० व संगमनेर आगाराला ९ अशा १९ बसेस देण्यात आल्याचीही माहीती आहे. इतर आगारांना मात्र बसेस मिळालेल्या नाहीत. म्हणून इतर सर्व आगारांनाही जास्तीत जास्त बसेस मिळाव्यात अशी मागणी खा. लंके यांनी केली आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांचे हाल
बसेसच्या अपुऱ्या संख्येमुळे खेडया-पाडयात जाणाऱ्या बसेसच्या फेऱ्या कमी झाल्याने ग्रामीण भागातून शहरी भागाकडे जाणा-या विशेषतः विद्यार्थी, विद्यार्थिनींचे हाल होत असल्याचे जाणवत असल्याचे खा. लंके यांनी निवेदनात नमुद केले आहे.