अहिल्यानगरमध्ये मस्साजोग ! अपहरण केलं ,फ्लॅटवर डांबलं,चेंबरमध्ये मारहाण, व्हिडीओ आणि डोंगरावर जाळलं…

Updated on -

Ahilyanagar Breaking : मस्साजोग घटनेची धक्कादायक आठवण ताजी असतानाच, अहिल्यानगरमध्ये एक थरारक गुन्हा उघडकीस आला आहे. दोन तरुणांचे अपहरण करून त्यांना गटारीच्या चेंबरमध्ये कोंबून अमानुष मारहाण करण्यात आली. यात वैभव ऊर्फ सोन्या नायकोडी (वय १९, रा. ढवणवस्ती, अहिल्यानगर) याचा मृत्यू झाला.

त्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह नगर-मनमाड रोडवरील विळदघाट परिसरात डोंगरावर नेऊन जाळून टाकला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत नऊ आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेला टोळीवादा तून उगम मिळाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

हत्या कशी घडली ?

पहिल्या अपहरणाची सुरुवात : पहिल्या अपहरणाची सुरुवात ही घटना २१ फेब्रुवारीपासून सुरू झाली. संदेश भागाजी वाळूज ऊर्फ गल्वा (वय १९, रा. नवनागापूर) याचे अपहरण आरोपींनी त्याच्या घरातूनच केले. त्याला गाडीत टाकून एमआयडीसीतील गरवारे चौकात आणले, तिथे त्याला निर्दयपणे मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला निर्जनस्थळी नेत गटारीच्या चेंबरमध्ये कोंबले गेले. या मारहाणीचा आरोपींनी व्हिडीओ देखील काढला. संध्याकाळी संदेशला नागापूर येथील एका फ्लॅटमध्ये रात्रभर डांबून ठेवण्यात आले.

दुसऱ्या अपहरणाचा कट : दुसऱ्या दिवशी, म्हणजे २२ फेब्रुवारीला आरोपींनी संदेशला वैभव नायकोडीला फोन करण्यास भाग पाडले. संदेशने वैभवला तपोवन रोडवरील एका रुग्णालयाजवळ बोलावले. आरोपींनी संदेशच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्याला वैभवच्या ठिकाणी नेले आणि ओळख पटवल्यानंतर दोघांनाही निर्जनस्थळी नेत गटारीच्या चेंबरमध्ये पुन्हा कोंबून अमानुष मारहाण केली. रात्री दोघांनाही नागापूरमधील फ्लॅटमध्ये डांबून ठेवण्यात आले. तिथे त्यांना मॅगी खाण्यास दिली. संदेशने ती खाल्ली, परंतु वैभवने खाण्यास नकार दिला. त्यामुळे त्याला अधिक मारहाण करण्यात आली.

हत्येचा कट : दुसऱ्या दिवशी पहाटे आरोपींनी वैभवला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो श्वास घेत नव्हता. त्याचे शरीर थंड पडले होते. तो मृत असल्याचे लक्षात येताच आरोपी घाबरले. तेव्हा आरोपींनी त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा कट रचला. नगर-मनमाड रोडवरील विळदघाट परिसरातील डोंगरात मृतदेह नेण्यात आला आणि केकताईच्या डोंगरात जाळून टाकण्यात आला. त्यानंतर आरोपींनी संदेशला धमकावून सोडून दिले आणि कुठेही बोलू नये म्हणून ताकीद दिली.

हत्येमागील कारण

या हत्येमागील मुख्य कारण म्हणजे दोन टोळ्यांमध्ये सुरु असलेला वाद. १९ जानेवारी रोजी आरोपी अनिकेत ऊर्फ लपक्या सोमवंशीवर एका अल्पवयीन मुलासह पाच जणांनी कोयत्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात मयत वैभव नायकोडी आणि संदेश भागाजी हे दोघेही सहभागी टोळीशी संबंधित होते. त्यामुळे आरोपींनी वैराचा बदला घेण्यासाठी त्यांचे अपहरण करून अमानुष अत्याचार केले आणि शेवटी वैभवची हत्या केली.

गुन्ह्यातील आरोपी 

या प्रकरणातील नऊ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अटक आरोपींची नावे

अनिकेत ऊर्फ लपक्या विजय सोमवंशी, सुमित बाळासाहेब थोरात, महेश मारुतराव पाटील, नितीन अशोक नन्नावरे, विशाल दीपक कापरे, विकास अशोक गव्हाणे, करण सुंदर शिंदे, रोहित बापूसाहेब गोसावी, स्वप्नील रमाकांत पाटील,

सोशल मीडिया वाद 

पोलिस तपासात असेही समोर आले आहे की, या दोन टोळ्यांमध्ये सोशल मीडियावर सातत्याने वाद होत होते. एकमेकांविरोधात पोस्ट टाकून धमक्या दिल्या जात होत्या. या ऑनलाईन वादातूनच संघर्ष आणखी तीव्र झाला आणि शेवटी वैभवच्या हत्येपर्यंत तो पोहोचला.

फिर्यादीतून हत्येचा उलगडा

संदेश भागाजी याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ही हत्या उघडकीस आली. त्याने पोलिसांना सांगितले की, अपहरणानंतर आरोपींनी त्याला जिवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर पोलिसांनी तपास करत नऊ आरोपींना अटक केली.

ही घटना टोळीवादातून घडलेली असून, सोशल मीडियावरील वादांमुळे ती अधिक चिघळल्याचे दिसून येत आहे. पोलिस तपासादरम्यान आणखी काही आरोपींची नावे समोर येण्याची शक्यता आहे. नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलिस त्यांच्याकडून अधिक माहिती घेत आहेत.

जेव्हा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले, तेव्हा त्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. यामुळे पोलिसांनी तातडीने अतिरिक्त बंदोबस्त वाढवला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe