Dhanjay Munde Resigned : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे . मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो स्वीकारला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर तब्बल ८२ दिवसांनी हा राजकीय निर्णय घेण्यात आला.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यासाठी त्यांचे पीए सागर बंगल्यावर पोहोचले, आणि त्यानंतर मुख्यमंत्री तातडीने विधानभवनाच्या दिशेने रवाना झाले. आता मुख्यमंत्री फडणवीस विधानभवनात अधिकृतपणे या राजीनाम्याची घोषणा करणार आहेत.

अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या वादाला पूर्णविराम
९ डिसेंबर २०२४ रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. विरोधकांनी यावरून सरकारवर तीव्र हल्लाबोल केला. कालच या प्रकरणाशी संबंधित CIDच्या दोषारोपपत्रातील काही महत्त्वाचे फोटो आणि माहिती बाहेर आली, त्यामुळे जनतेच्या भावना अधिक तीव्र झाल्या.
यामुळे राजकीय वातावरण प्रचंड तापले आणि विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. अखेर, आज सकाळपासून राजीनामा दिल्याच्या चर्चांना मूर्तरूप मिळाले आणि धनंजय मुंडे यांनी पदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा स्वीकारला असून, विधानभवनात लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.