१९ मार्च २०२५, संगमनेर : संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी गावाजवळील ब्राह्मणदरा डोंगराला लागलेल्या भीषण आगीत एका गुराख्यासह दोन जनावरांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, म्हसवंडी येथील रहिवासी सीताराम तुकाराम जाधव (वय ५३) हे मंगळवारी (१८ मार्च) जनावरे चारण्यासाठी ब्राह्मणदरा डोंगरावर गेले होते. संध्याकाळी उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत,

त्यामुळे त्यांच्या भावासह कुटुंबीयांनी परिसरात त्यांचा शोध सुरू केला. मात्र, डोंगराला भीषण आग लागल्याचे लक्षात आल्याने शोधकार्य थांबले. बुधवारी सकाळी पुन्हा शोधासाठी गेले असता, कुटुंबीयांना जाधव आणि दोन जनावरांचे आगीत होरपळलेले मृतदेह आढळले.
या घटनेची माहिती गावात पसरताच ग्रामस्थ आणि घारगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जाधव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घुलेवाडी कुटीर रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी शिवाजी दत्तात्रय जाधव यांच्या माहितीवरून घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दुर्घटनेने म्हसवंडी गावासह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. ग्रामस्थांनी या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे.